देवा, विराट कोहलीला ‘टॉस’ जिंकू दे!

Virat Kohli
  • *पूणे कसोटीआधी भारतीय समर्थक करत असतील प्रार्थना
  • *कोहलीने टॉस जिंकलेला एकही सामना भारताने गमावलेला नाही
  • *23 सामन्यात 19 विजय, चार अनिर्णित
  • *टॉस गमावलेल्या 26 पैकी 10 सामने कोहलीने गमावले

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून पुणे येथे खेळला जाणार आहे. हा सामना भारताने जिंकावा ही तर समस्त भारतियांची इच्छा असेलच परंतु त्याआधी या सामन्यात विराट कोहलीनेच नाणेफेक जिंकावी अशी प्रार्थना भारतीय संघाचे पाठीराखे करत असतील कारण, कर्णधार म्हणून विराट कोहलीने जेवढ्या कसोटी सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकली आहे त्यापैकी एकही सामना भारताने गमावलेला नाही. उलट अशा 23 पैकी 19 सामने भारताने जिंकले असून चार अनिर्णित राहिले आहेत.

यातही विशेष बाब म्हणजे या जिंकलेल्या 19 च्या 19 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय.खरं तर या 23 फक्त फक्त एकाच सामन्यात कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती दिली आहे. याच्या तुलनेत विराटने कर्णधार म्हणून 26 सामन्यात नाणेफेक गमावलीय आणि त्यातील 10 सामने गमावले आहेत.

याशिवाय आणखी दुसरं एक कारण म्हणजे कर्णधार म्हणून आपल्या कारकिर्दीतील पूणे येथील एकमेव सामना विराटने गमावला होता. फेब्रुवारी 2017 मधील त्या कसोटीत अॉस्ट्रेलियाने विराटच्या संघाचा 333 धावांनी दारुण पराभव केला होता. त्या सामन्यात नेमकी विराटने नाणेफेक गमावली होती. हा इतिहास पाहता पूणे येथे गुरुवारी विराट कोहलीनेच नाणेफेक जिंकावी अशी भारतीय पाठिराख्यांची इच्छा असेल तर त्यात काही गैर नाही.

विराटने कर्णधार म्हणून नाणेफेक जिंकलेले सामने

निकाल विरुध्द ठिकाण वर्ष
अनिर्णित- बांगलादेश- फातुल्ला- 2015
विजय- श्रीलंका- कोलंबो- 2015
विजय- द. आफ्रिका- मोहाली- 2015
अनिर्णित- द. आफ्रिका- बंगळुरू- 2015
विजय- द. आफ्रिका- नागपूर- 2015
विजय- द. आफ्रिका- दिल्ली- 2015
विजय- वेस्ट इंडिज- नॉर्थ साऊंड- 2016
विजय- न्यूझीलंड- कानपूर- 2016
विजय- न्यूझीलंड- कोलकाता- 2016
विजय- न्यूझीलंड- इंदूर- 2016
विजय- इंग्लंड- विशाखापट्टणम-2016
विजय- बांगलादेश- हैदराबाद- 2017
विजय- अॉस्ट्रेलिया- बंगळुरू- 2017
विजय- श्रीलंका- गॉल- 2017
विजय- श्रीलंका- कोलंबो- 2017
विजय- श्रीलंका- पल्लेकल- 2017
अनिर्णित- श्रीलंका- दिल्ली- 2017
विजय- द. आफ्रिका- जोहान्सबर्ग- 2018
विजय- वेस्ट इंडिज- राजकोट- 2018
विजय- अॉस्ट्रेलिया- अॕडिलेड- 2018
विजय- अॉस्ट्रेलिया- मेलबोर्न- 2018
अनिर्णित- अॉस्ट्रेलिया- सिडनी- 2019
विजय- द. आफ्रिका- विशाखापट्टणम- 2019