विराट कोहली, केन विल्यम्सन आणि बाळाच्या आगमनातील विलक्षण योगायोग

Kane Williamson - Virat Kohli

‘विरुष्का’ (Veeruskha) नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) व अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या लग्नाचा आज तिसरा वाढदिवस. 2017 मध्ये ते जोडीदार बनले होते आणि आता ते दोनचे तीनसुध्दा होणार आहेत. त्यांच्याकडे जानेवारी 2021 मध्ये बाळाचे आगमन होणार आहे आणि त्यासाठी विराटने पितृत्व रजासुध्दा घेतली आहे. आॕस्ट्रेलियाविरुध्दच्या दौऱ्यातून पहिल्या कसोटीनंतर तो मायदेशी परतणार आहे जेणेकरुन तो बाळाच्या आगमनावेळी उपस्थित राहील.

तिकडे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन (Kane Williamson) हासुध्दा पिता बनणार आहे आणि त्यानेसुध्दा पितृत्व रजा घेतली आहे. वेस्टइंडिजविरुध्द आजपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीत तो खेळत नसून त्याच्या जागी टॉम लॕथमकडे न्यूझीलंडचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत असलेल्या या दोन खेळाडूंच्याबद्दल साधारण एकाच काळात पिता बनण्यासोबतच आणखीनही काही थक्क करणारे योगायोग आहेत. जसे की, दोघेही 19 वर्षाआतील विश्वचषक स्पर्धेत एकाच वर्षी चमकले, दोघेही कर्णधार आहेत, दोघेही कसोटी क्रमवारीत सोबतच दुसऱ्या स्थानी आहेत, दोघेही विश्वचषक जिंकू शकलेले नाहीत, दोघेही मालिकेतील दुसरा कसोटी सामना पितृत्व रजेसाठी खेळत नाहीयेत आणि दोघेही लवकरच पिता बनणार आहेत.

2008 च्या 19 वर्षाआतील विश्वचषक स्पर्धेत केन विल्यमसनच्या नेतृत्वातील किवी संघ उपांत्य फेरीत भारताकडून पराभूत झाला होता तर 2019 च्या वन डे विश्वचषक स्पर्धेत या दोघांच्याच नेतृत्वात पुन्हा आमना सामना झाला त्यावेळी न्यूझीलंडने बाजी मारली होती.

केन विल्यम्सनची साथीदार सारा रहिम (Sarah Raheem) ही जन्माने ब्रिटीश पण न्यूझीलंडमध्ये कार्यरत नर्स आहे. केनने आपल्या कुटुंबाला प्रसिध्दिच्या झगमगाटापासून जरा लांबच ठेवले आहे.

दरम्यान, विराट कोहलीने आपल्या लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसानिमीत्त एक खास फोटो ट्विट केला असून त्यासोबत ‘थ्री इयर्स अँड आॕन टू अ लाईफ टाईम टूगेदर’ असा संदेश दिला आहे. विरुष्का हे तीन वर्षापूर्वी इटलीत विवाहबध्द झाले होते. यंदा आॕगस्टमध्ये त्यांनी बाळाच्या आगमनाची बातमी सोशल मिडियावर जाहीर केली होती.

न्यूझीलंडचे संघप्रशिक्षक गॕरी स्टीड म्हणाले की, एक पिता व पालक बनण्याची संधी आयुष्यात खासच असते आणि पहिल्या अपत्यावेळी ती मिळत असते म्हणून केनसाठीच नाही तर पिता बनणाऱ्या प्रत्येकासाठी हे क्षण महत्त्वाचे असतात. क्रिकेट तर आम्ही खेळतच असतो पण इतर गोष्टीसूध्दा महत्त्वाच्या असतात. केननेसुध्दा म्हटले आहे की पिता बनणे ही वेगळीच अनुभूती असते. तो आनंद अनुभवण्यास मी उत्सूक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER