काश्मिरात दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर हिंसाचाराला सुरुवात!

Kashmir-Violence

श्रीनगर :- जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या मुजगुंड परिसरात दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये शनिवारपासून मोठी चकमक सुरु असून, भारतीय जवानांनी एका पाकिस्तानी दहशतवाद्यासह दोन दहशतवाद्यांना ठार केले. तर या चकमकीवेळी पाच जवान जखमी झाले आहेत. चकमकीवेळी दहशतवादी लपलेल्या घराला आग लागली. या घरासह चार घरे नेस्तनाभूत झाली आहेत.

ही बातमी पण वाचा : सुरक्षा दिल्यास काश्मिरी पंडितांची घरवापसी शक्य – विनय सहस्त्रबुध्दे

अधिकाऱ्यांना सांगितले की, शनिवारी संध्याकाळी साडेचार वाजता लाल चौकापासून १५ किमी दूरवरील मुजगुंड मलूरा भागात तीन ते चार दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर जवानांनी पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीने परिसराला घेराव घातला. यावेळी चाललेल्या शोधावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. यानंतर जोरदार गोळाबार करण्यात आला.

दहशतवादी शेख हमजा शाळेजवळील एका घरामध्ये लपले होते. या गोळीबारात सीआरपीएफ आणि पोलिसांचे दोन जवान जखमी झाले. यानंतर एका तासाच्या चकमकीनंतर एका दहशतवाद्याला मारण्यात यश आले. नंतरच्या तासाभरात आणखी एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. ही चकमक आजही सुरुच असून खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण श्रीनगरमधील मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा : श्रीनगर: मुठभेड़ में 3 आतंकी ढेर, 5 जवान घायल

दरम्यान, मुजगुंडमध्ये चकमकीची बातमी पसरताच एचएमटी, पंरपोरा, मलूरा, लावेपोरा आणि अन्य भागांमध्ये मोठ्या संख्येने युवकांनी रस्त्यावर उतरत दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी या युवकांनी भारत विरोधी आणि जिहादी घोषणा दिल्या. सुरक्षादलांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत लाठीमारही केला. पॅलेट गनच्या माऱ्यात ५ आंदोलक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

ही बातमी पण वाचा : चार राज्यांच्या निकालाचे असे आहेत वेगवेगळ्या वृत्त वाहिन्यांचे एक्झिट पोल