आयफोन निर्माता ‘विस्ट्रान’च्या कार्यालयात जाळपोळ व तोडफोड

Wistron iPhone Manufacturing Unit Kolar

बंगळुरू : आयफोन (iPhone) बनवणारी तैवानची टेक्नोलॉजी कंपनी विस्ट्रानच्या (Wistron) बंगळुरूमधील (Bangalore) कार्यालयात शनिवारी कर्मचाऱ्यांनी तोडफोड व जाळपोळ केली. अनेक महिन्यांचे वेतन न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी ही तोडफोड केल्याचे कळते.

विस्ट्रानच्या बंगळुरुमधील कारखान्यात आय़फोन आणि इतर कंपन्यांसाठी मोबाइलची निर्मिती होते. कर्नाटक सरकारने या हिंसाचाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांना थकीत वेतन मिळवून देण्याचेही आश्वासन दिले आहे.

विस्ट्रानच्या कोलार जिल्ह्यातील नरसापूरच्या कारखान्यात शनिवारी सकाळी काही कर्माचाऱ्यांच्या विरोधाने हिंसक वळण घेतले. कर्मचाऱ्यांनी कंपनीविरोधात घोषणा दिल्यात. त्यांनतर कार्यालयावर दगडफेक केली, कंपनीचे काही फलक व वाहने पेटवून दिलीत.

एका कामगार नेत्याने सांगितले की, येथील बहुतांश कर्मचारी करारावर आहेत. त्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. शिवाय, वेतनात अनेक प्रकारची कपातही केली जात असल्यामुळे कर्मचारी नाराज होते. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत गोंधळ घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना हटवले.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. सी अश्वतनारायण यांनी ट्विट केले – कुणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी नाही. कोणताही प्रश्न सोडवण्याचा हा योग्य मार्ग नाही. हिंसाचार करणाऱ्यांवर पोलीस योग्य कारवाई करतील. कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची देखील दक्षता घेतली जाईल. त्यांना थकीत वेतन दिले जाईल.

विस्ट्रान कंपनी नरसापूर कारखान्यातील कर्मचाऱ्यांची संख्या दोनशेवरून आठ हजार करण्याच्या विचारात आहे. कंपनी इथे मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्विस सेंटर निर्माण करू इच्छिते. इथे अॅपलचा आय़फोन 7, लिनोवो आणि माइक्रोसॉफ्टचे देखील काही उत्पादन तयार होतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER