मोगलांना संताजी-धनाजी दिसायचे तसे विरोधकांना मुख्यमंत्री दिसताहेत- विनायक राऊत

Vinayak Raut on Devendra Fadnavis

रत्नागिरी : महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) आपल्याच अंतर्गत वादाने कोसळणार, असा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपातील नेते करताना दिसत आहेत. त्यांच्या या दाव्याला फेटाळून लावत शिवसेनेचे (Shivsena) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. देवेंद्र फडणवीस यांना काही काम नाही. फडणवीस यांनी नितीन गडकरी यांनी केलेल्या आवाहनाकडे लक्ष द्यावे. मोगलांना संताजी-धनाजी दिसायचे तसे फडणवीस आणि प्रवीण दरेकरांना महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री दिसत आहेत. महाविकास आघाडीत खदखद आहे म्हणून फुगा फुटणार असं ज्यांना वाटतंय त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटणार आणि महाविकास आघाडी कायम रहाणार, असा दावाही विनायक राऊत यांनी केला.

यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राऊत यांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली. मराठा आरक्षणाच्या अभ्यासासाठी नियुक्त केलेल्या नारायण राणे समितीने काय दिवे लावले? राणे समितीने मराठा आरक्षणाचा सत्यानाश केला. मराठा आरक्षणाच्या समितीचा अहवाल एका अडाणी माणसाच्या हाती दिला गेला याचंच आश्चर्य वाटलं, अशा शेलक्या शब्दांत राऊत यांनी राणेंवर टीका केली. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे वेळ नाही. आम्ही दोनदा वेळ मागितला होता; पण पंतप्रधानांनी आम्हाला वेळ दिला नाही. महाविकास आघाडीला मराठा आरक्षणाचे श्रेय जाऊ नये म्हणून केंद्र सरकारला वेळकाढूपणा करायचा होता. श्रेयवादाचा मुद्दा केंद्र सरकारनेच उपस्थित केला आहे. मराठा आरक्षणावर महाविकास आघाडी पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात विचार करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

खासदार संभाजी छत्रपती आणि नारायण राणेंची बरोबरी होऊ शकत नाही. संभाजीराजेंनी मला दे, मला दे असं भांडून खासदारकी मिळवली नाही. त्यांना दिलेली खासदारकी हा त्यांचा बहुमान आहे. मात्र राणेंची सोशल मीडियावरून केवळ प्रसिद्धीसाठी टिवटिव सुरू आहे. मराठा आंदोलन करणारे नेते मराठा आरक्षण प्रश्न चिघळवण्याचे काम करत आहेत. संभाजीराजेंची संयमाची भूमिका योग्यच आणि कौतुकास्पद आहे, असंही ते म्हणाले.

शिवसेना खासदार संजय राऊत हे महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे, त्यांचे मार्गदर्शन शिरसावंद्य मानले जाते. त्यांचे मार्गदर्शन, त्यांचे उपदेश नेहमीच आम्हाला आदर्श आहे, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button