दाभोलकर खून खटल्यातील आरोपी विक्रम भावेला जामीन

Dr. Narendra Dabholkar - Bombay High Court - Vikram Bhave
  • हायकोर्ट म्हणते आरोप खरे वाटत नाहीत

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या खून खटल्यातील आरोपी विक्रम भावे (Vikram Bhave) यास मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) जामीन मंजूर केला. ‘सीबीआय’ने २५ मे, २०१९ रोजी अटक केल्यापासून भावे तुरुंगात होता.

भावेने जामिनासाठी केलेले दोन अर्ज बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याखालील (UAPA) पुणे येथील विशेष न्यायालयाने फेटाळले होते. त्याविरुद्ध भावेने केलेली अपिले मंजूर करून न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठाने त्याला एक लाख रुपयांच्या जामिनावर सोडण्याचा आदेश दिला. खटल्याचा निकाल होईपर्यंत पुण्यातील संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या व खटल्यातील साक्षीदार आणि पुराव्यांमध्ये ढवळाढवळ न करण्याच्या अटी घालण्यात आल्या.

‘सीबीआय’ने सादर केलेले पुरावे भावे याच्याविरुद्धचे आरोप प्रथमदर्शनी खरे वाटावेत एवढे प्रबळ नाहीत. तसेच नजिकच्या भविष्यकाळात खटला संपण्याची शक्यता दिसत नाही, या दोन कारणांवरून खंडपीठाने हा जामीन मंजूर केला.

‘यूएपीए’ कायद्यात जामिनासाठी कठोर अटी आहेत व आरोपीवरील आरोप प्रथमदर्शनी खरे मानण्याएवढेही त्याच्याविरुध पुरावे नाहीत, असे न्यायालयास वाटत असेल तरच आरोपीला जामीन दिला जाऊ शकतो. असे असूनही जामीन मंजूर करताना खंडपीठाने म्हटले की, कर्नाटकमधील पत्रकार गौरी लंकेश .यांच्या खून खटल्यातील आरोपी शरद काळसकर याचा कबुलीजबाब एवढाच पुरावा ‘सीबीआय’ने भावे याच्याविरुद्ध सादर केला आहे. पण काळसकरचा कबुलीजबाब भावेविरुद्ध पुरावा म्हणून कितपत ग्राह्य धरता येईल याबद्दल आम्हाला साशंकता आहे. याचे करण असे की, काळसेकरविरुद्धचा खटला ‘ककोका’ क़ायद्याखालचा आहे. त्या कायद्यानुसार एका ओरोपीचा कबुलीजबाब फक्त त्याच खटल्यातील दुसर्‍या आरोपाविरुध पुरावा म्हणून ग्राहय धरता येतो.

दाभोलकर यांचा खून २० ऑगस्ट, २०१३ रोजी सकाळी ते ‘मॉर्निंग वॉक’ करत असताना गोळया घालून झाला होता. यांच्या १५ दिवस आधी कथित ‘शार्पशूटर’ शरद काळसकर व सचिन अंदुरे यांना त्या जागेची पाहणी करण्यास व खुनानंतर पळून जाण्यास भावे याने मदत केली होती, असा त्याच्याविरुद्ध आरोप आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button