विखे-थोरात वाद अन् रोहित पवारांच्या उडीने नगरचे राजकारण तापणार

Ahmednagar Vidhan Sabha

गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या परंपरागत वादाभोवती अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण आगामी विधानसभा निवडणुकीतही फिरणार हे नक्कीच. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि वारसदार म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते ते रोहीत पवार हे या जिल्ह्यातून लढणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष त्याकडे राहणार आहे. सहकारी साखर कारखानदारी, उद्योग, शेती आणि दूध व्यवसायाच्या आधारे समृद्धी साकारलेल्या या जिल्ह्याने पराकोटीचा राजकीय संघर्ष नात्यागोत्याची गुंतागुंत असलेले राजकारण हे अनेक वर्षे अनुभवले आहे. कधी तो विखे-थोरात असा राहिला तर कधी विखे-गडाख आणि विखे-पवार असादेखील राहिला. अतिश्रीमंत नेत्यांमधील सोन्याच्या विटांचे भांडणही जिल्ह्याने अनुभवले. आजही तीच परंपरा कायम आहे. राजकीय वाद एका पिढीतून दुसºया पिढीत तेवढ्याच तीव्रतेने झिरपलेला पहायचा असेल तर नगरच्या राजकारणाकडे बघावे लागेल.

ही बातमी पण वाचा : ‘लक्षात असूद्या, आपला गडी लई भारी आहे,’ पवारांवर झालेल्या कारवाईनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

शरद पवार यांच्यासोबत अलिकडे सातत्याने वावरणारे त्यांचे नातू रोहित पवार यांची लढत कर्जत-जामखेडमध्ये असेल तरी राज्याचे विद्यमान कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांच्याशी. शिंदे हे अहल्यादेवी होळकर यांचे वारसदार आहेत. जामखेडचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ११७ कोटी रुपयांची योजना आणणारे जलदूत ही ओळख त्यांनी निर्माण केली आहे. या आधी ते दोनवेळा जिंकले आता हॅटट्रिकच्या प्रतीक्षेत आहेत. मराठा, वंजारी, धनगर मतांची लक्षणीय संख्या असलेला हा मतदारसंघ आहे. पारनेरमध्ये शिवसेना पुन्हा एकदा विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांना संधी देणार असली तरी त्यांना यावेळी लढत सोपी नाही. राष्ट्रवादीकडून नीलेश लंके हा तरुण दमदार नेता किल्ला लढविणार असून ‘अ‍ॅँटीइन्कम्बन्सी फॅक्टर’ औटी यांच्याबाबत दिसतो आणि त्याचा फायदा लंके घेऊ शकतात. अर्था, औटी यांना निवडणुकीचे गणित चांगले जमते. त्यामुळे लढत तुल्यबळ होईल.

ही बातमी पण वाचा : … तर मी खासदारकीचा राजीनामा देईल – सुजय विखे

आदिवासी राखीव अकोले मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड आणि त्यांचे वडील मधुकर पिचड भाजपमध्ये गेले असून ते बालेकिल्ला शाबूत ठेवतील अशी स्थिती आहे. पिचड यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात असून त्याला भाजपचे बळ मिळाले आहे. मात्र, पिचडांविरुद्ध संघर्ष करणारे भाजपचे नेते अशोक भांगरे काय करतात हे महत्त्वाचे असेल.ते राष्ट्रवादीत गेले आहेत.

संगमनेरचे साम्राज्य काँग्रेसचे बाळासाहेब थोरात सलग आठव्यांदा शाबूत ठेवणार अशी चिन्ह आहेत. ही जागा युतीमध्ये शिवसेनेकडे आहे पण थोरात यांना चांगले आव्हान उभे करू शकेल असा चेहरा नाही. राजेंद्र राहणे, जनार्दन आहेर, जयवंत पवार, बाबासाहेब कुटे इच्छुक आहेत. जागा बदलली गेली तर भाजपकडून रामदास शेजूळ, शाळीग्राम होडगकर, रवींद्र विरोले आदी इच्छुक आहेत.

श्रीरामपूरमध्ये गेल्यावेळी काँग्रेसतर्फे जिंकलेले भाऊसाहेब कांबळे यांनी शिवबंधन बांधले असून ते आता शिवसेनेचे उमेदवार असतील. शिवसेनेचा अंतर्गत विरोध ते कसे शांत करतात यावर बरेच काही अवलंबून असतील.माजी आमदार भानुदास मुरकुटे कांबळेंच्या पाठीशी आहेत. माजी शासकीय अधिकारी लहू कानडे हे येथे काँग्रेसचे उमेदवार असतील. गेल्यावेळी ते शिवसेनेचे उमेदवार होते आणि त्यांना ३८ हजार मते मिळाली होती. राहुरीमध्ये भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांच्याविरुद्ध माजी आमदार प्रसाद तनपुरे यांचे पुत्र प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादीचे उमदेवार असतील. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या मतदारसंघातील प्रभावाचा फायदा कर्डिले यांना होईल. श्रीगोंदा या मतदासंघात विचित्र स्थिती आहे. विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे राहुल जगताप हे भाजपच्या वाटेवर आहेत. भाजपने त्यांना उमेदवारी दिली तर गेल्यावेळी भाजपकडून लढलेले माजी मंत्री बबनराव पाचपुते हे अपक्ष वा राष्ट्रवादीकडून लढू शकतात.

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजीव राजळे यांना पुन्हा संधी दिली जाईल हे निश्चित आहे. गेल्यावेळी त्यांच्याकडून पराभूत झालेले चंद्रशेखर घुले पुन्हा राष्ट्रवादीकडून लढू शकतात. बहुजन वंचित आघाडीने या ठिकाणी वंजारी उमेदवार दिला तर राजळे यांची डोकेदुखी वाढणार आहे. नेवासे मतदासंघात किमान त्रिकोणी संघर्ष अटळ आहे. भाजप विद्यमान आमदार बाळासाहेब तनपुरे यांना संधी देईल. माजी आमदार आणि क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नेते शंकरराव गडाख यांनी जोरदार तयारी केली आहे. राष्ट्रवादीकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे उमेदवार असतील, अशी दाट शक्यता आहे.

शिर्डी हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला. ते भाजपचे उमेदवार असतील. आजतरी त्यांच्यासमोर लढविण्यासाठी काँग्रेसकडे सक्षम उमदेवार नाही. विखे या ठिकाणी बिनधास्त आहेत.

कोपरगावमध्ये कोल्हे घराण्याच्या स्रूषा आणि विद्यमान आमदार स्रेहलता कोल्हे यांनाच भाजप पुन्हा उमेदवारी देणार हे स्पष्ट आहे. त्यांचे प्रबळ विरोधक आणि काळे घराण्याचे वारसदार आशुतोष काळे गेल्यावेळी शिवसेनेकडून लढले होते. यावेळी ते राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे अपक्ष लढले तर विरोधकांच्या मतांची विभागणी होऊन कोल्हे यांना फायदा होईल.