विखे पाटील यांनी २०८ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबे घेतली दत्तक

Vikhe Patil

मुंबई : सत्कार, स्वागत आणि पुष्पगुच्छांना फाटा देत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आपल्या वाढदिवशी अहमदनगर जिल्ह्यातील २०८ शेतकरी कुटुंबांना दत्तक घेऊन नवा आदर्श निर्माण केला आहे. बळीराजावर असलेलं आत्महत्याच सावट दूर करायचं असेल तर राजकीय पुढाऱ्यांनी राजकारण बाजुला ठेवून आपआपल्या तालुक्यातील, जिल्यातील शेतकऱ्यांना सर्वांगीण आधार देण्याचे दायीत्व स्वीकारले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी विखे पाटील परिवार व त्यांच्या स्वयंसेवी संस्थांमार्फत पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंब सहाय्य योजनेचा शुभारंभ करण्यात आला. अहमदनगर येथील नंदनवन लॉन्सवर झालेल्या अत्यंत भावनिक कार्यक्रमात विखे पाटील यांनी आत्महत्या केलेल्या २०८ शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे पालकत्व स्वीकारले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक शांतीलाल मुथा होते.

या दत्तक योजनेतील २०८ लाभार्थी कुटुंबांच्या साक्षीने योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर कार्यक्रमाला संबोधित करताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आज आम्ही विरोधी पक्षात आहोत म्हणून केवळ सरकारवर टीका करून थांबणार नाही. शेतकऱ्यांसाठी आमचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत राहू. शेतकऱ्यांची व्यथा सरकारसमोर आक्रमकपणे मांडत राहू आणि सोबतच आमची नैतिक जबाबदारीही पूर्ण करू. घरातील कर्त्या व्यक्तीच्या आत्महत्येनंतर हतबल झालेल्या शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी उभे राहण्याचा हा निर्णय त्याच जबाबदारीचा एक भाग आहे. या योजनेच्या माध्यमातून भविष्याच्या चिंतेने ग्रासलेल्या या 208 कुटुंबांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण करू शकलो आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास थोडा फार हातभार लावू शकलो तर यापेक्षा मोठे समाधान असू शकत नाही, असेही विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक शांतीलाल मुथा यांनी विखे पाटील कुटुंबाच्या या उपक्रमाचे मुक्त कंठाने कौतूक केले. ते म्हणाले की, या कुटुंबाची सर्वसामान्यांप्रती असलेली आस्था मी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या काळापासून प्रत्यक्षपणे अनुभवली आहे. तीच आस्था डॉ. सुजय विखे पाटील यांच्या रूपात चौथ्या पीढीतही कायम असल्याचे या योजनेतून स्पष्ट झाले आहे.

मागील चार पिढ्यांपासून विखे पाटील कुटुंब समाजकारणात आहे. आपले समाजासाठी काही तरी देणे लागते, या भावनेतून आम्ही काम करतो आहोत. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकासाठी आम्ही अपघात विमा योजना सुरू केली आहे. त्याचा हप्ता विखे पाटील कुटुंबाकडून चुकता केला जातो. मागील अनेक वर्षांपासून डॉ. विखे पाटील फाऊंडेशनच्या रूग्णालयात मोफत किंवा सवलतीच्या दरातील औषधोपचाराच्या रूपात दरवर्षी कोट्यवधी रूपये लोकसेवेसाठी खर्च केले जातात. जलक्रांती अभियानाच्या माध्यमातून राहता-शिर्डी परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढविण्याचे मोहिम आम्ही राबवली. परंतु, या कामांची कधी प्रसिद्धी केली नाही. कारण लोकांसाठी कामे करा; त्याची प्रसिद्धी करू नका, अशी शिकवण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी आम्हाला दिली होती, असे सांगून युवक नेते डॉ. सुजय विखे पाटील पुढे म्हणाले की, मी पहिल्यांदा या योजनेची प्रसिद्धी करावी, असे आवाहन माध्यमांना करतो आहे. ही योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचली तर कदाचित आणखी काही जणांना असाच एखादा उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन मिळू शकेल.

या योजनेचा लाभ शासकीय अनुदानास पात्र ठरलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील 208 शेतकऱ्यांची पत्नी, आई-वडील, मुले-मुली यांना मिळणार आहे. या योजनेंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण, मुलींचा विवाह सोहळा,आरोग्य सुविधा आदी जबाबदाऱ्या विखे पाटील कुटूंब स्वीकारणार आहे. याशिवाय या 208 शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी आणि महिलांना शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी तसेच बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. संबंधित शेतकरी कुटुंबाचे घर राहण्यास योग्य नसेल तर त्यांना घर दुरुस्तीसाठीही सहकार्य केले जाणार आहे. शिवाय या कुटुंबांचा अपघात विमा देखील काढला जाणार आहे.