मंत्री असताना तुम्ही केलेले धंदे उघडे करण्यास भाग पाडू नका, वडेट्टीवार यांचा बावनकुळेंना इशारा

Chandrashekhar Bawankule - Vijay Wadettiwar

चंद्रपूर : चंद्रपुरात (Chandrapur) राजकीय नेत्यांच्या आशीर्वादामुळे वाळू आणि दारू तस्करी सुरू असल्याची टीका माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) जोरदार प्रत्युत्तर दिले. फडणवीस सरकारमध्ये मंत्री असताना बावनकुळे यांनी केलेले काळे धंदे त्यांना आठवले असतील, असा घणाघाती टोला विजय वडेट्टीवारांनी लगावला.

सध्या विजय वडेट्टीवार आणि भाजप (BJP) नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाळू आणि दारू तस्करीवरून त्यांनी एकमेकांवर चांगली टीकेची झोड उठवली आहे. चंद्रपुरात राजकीय आशीर्वादामुळे वाळू आणि दारू तस्करी जोमात सुरू असल्याची टीका बावनकुळे यांनी केली होती. या अवैध धंदेवाल्यांवर कारवाई करू नये, असे अलिखित आदेश सत्ताधारी नेत्यांनी दिले आहेत. त्यामुळे दारूबंदी अपयशी ठरत असून, वाळू तस्करी वाढली, असा गंभीर आरोपही बावनकुळे यांनी केला होता. तर त्याला उत्तर देताना पालकमंत्री वडेट्टीवार यांनी बावनकुळे मंत्री असताना त्यांनी केलेले काळे धंदे त्यांना आठवले असतील, असं टीकास्त्र सोडलं आहे.

बावनकुळे यांनी केलेल्या या आरोपांचा तेवढाच खरपूस समाचार घेताना विजय वडेट्टीवारम्हणाले की, फडणवीस सरकारमध्ये मंत्री असताना बावनकुळे यांनी काय उद्योगधंदे केले, हे मला सांगायला भाग पाडू नका. जगदंबा ट्रान्सपोर्ट आणि जगदंबा कन्स्ट्रक्शनद्वारे नागपुरात वाळू कोण आणत होता, हे आम्हाला माहीत नाही काय, असा टोलाही वडेट्टीवारांनी लगावला. सत्ता गेल्यामुळे आलेल्या नैराश्यातून हे बेताल वक्तव्य करत आहेत, असंही वडेट्टीवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER