विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण मंजूर होऊनही अडकले ‘गोपनीय’ प्रकरणामुळे होतोय खोळंबा

Vijay Mallya

नवी दिल्ली : आता गाशा गुंडाळलेल्या ‘किगफिशर एअरलाइन्स‘च्या नावे बँकांकडून घेतलेली हजारो कोटी रुपयांची कर्जे बुडवून देशातून पळून गेलेला ‘मद्यसम्राट’ उद्योगपती विजय मल्ल्या याचा भारताच्या स्वाधीन करण्यास (Extardition) ब्रिटनमधील सर्वात वरिष्ठ न्यायालयानेही मंजुरी दिली असली तरी त्यानंतर दाखल करण्यात आलेल्या ‘गोपनीय’  प्रकरणामुळे प्रत्यक्ष प्रत्यार्पण खोळंबले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयास सांगितले.

न्यायालयीन अवमानाच्या एका प्रकरणात दोषी ठरलेल्या मल्ल्याला न्या. उदय लळित व न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने, शिक्षेबाबत विचार करण्यासाठी, आज ५ ऑक्टोबर रोजी कोर्टापुढे जातीने हजर होण्याचा आदेश दिला होता. परंतु मल्ल्या आला नाही.

याचे कारण विचारले असता परराष्ट्र मंत्रालयाच्या वकिलाने सांगितले की, प्रत्यार्पण मंजूर होऊनही एका ‘गोपनीय’ (Secret) प्रकरणामुळे ते प्रत्यक्षात होऊ शकलेले नाही. गोपनीयचे कारण देऊन ब्रिटनमधील न्यायालयाने भारत सरकारला त्यात पक्षकारही केलेले नाही.त्यामुळे ते नेमके काय प्रकरण आहे, हे समजायला मार्ग नाही.

हे ऐकून, ‘हे गोपनीय प्रकरण कसले आहे’ असे खंडपीठाने मल्ल्या याच्या वकिलास विचारले. पण त्यानेही याविषयी आपल्याल काहीच माहिती नाही, असे सांगितले. आपला अशील ठरलेल्या तारखेला कोर्टापुढे का आला नाही हे त्याच्या वकिलास माहित असणे अपेक्षित आहे, असे सांगून न्यायमूर्तींनी  नाराजी व्यक्त केली. ते गोपनीय प्रकरण नेमके काय आहे, ते कधी संपण्याची शक्यता आहे व मल्ल्या केव्हा हजर होऊ शकतो याविषयी मल्ल्याच्या वकिलास माहिती घेण्यास सांगून खंडपीठाने पुढील तारखेला येण्यास सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER