
सिडनी कसोटी (Sydney Test) वाचविण्यात ज्याने बाजी लावली, जखमी झाला पण आॕस्ट्रेलियन गोलंदाजांना दाद दिली नाही त्या हनुमा विहारीने (Hanuma Vihari) संघातील वातावरण कसे खेळीमेळीचे होते आणि त्याचा परिणाम संघाची कामगिरी उंचावण्यात कसा झाला याचे अनुभव गुरुवारी मायदेशी परतल्यावर शेअर केले आहेत. त्यातील सर्वात थक्क करायला लावणारा अनुभव म्हणजे त्याने सांगीतले की, संघप्रशिक्षक रवी शास्री (Ravi Shastri) यांनी अॕडिलेड कसोटीतील(Adelaide Test) लाजिरवाण्या पराभवाची नंतर आम्हाला जाणीवसुध्दा होऊ दिली नाही. एरवी एवढ्या दारुण पराभवानंतर आगपाखड होत असते, एकमेकांवर दोषारोप होत असतात पण टीम इंडियात (Team India) असे काहीच घडले नसल्याचा अतिशय समाधानकारक खुलासा त्याने केला आहे. त्यामुळेच संघाचे मनोधैर्य कायम राहिले आणि पुढचा चमत्कार घडला असे मत त्याने मांडले आहे. हा पहिला कसोटी सामना गमावल्यावर भारताने 2-1 अशी मालिका जिंकून सर्वांनाच आश्चर्यचकीत केले.
अॕडिलेड कसोटीत भारतीय संघ अवघ्या 36 धावांत बाद झाला होता आणि त्यानंतर ही मालिका भारत गमावेल, काहींनी तर 4-0 अशी गमावेल असे भाकित केले होते. या मनोधैर्य खचविणाऱ्या कामगिरीनंतर भारतीय संघातील प्रमुख खेळाडू एकापाठी एक जायबंदी होत गेल्याची भर पडत गेली. शीवीगाळ, शरीरवेधी गोलंदाजी, रेस्टाॕरंटमध्ये गेल्याचा वाद, प्रेक्षकांमधून रंगभेदी शेरेबाजी असे प्रकार घडले पण या सर्वात संघप्रशिक्षक रवी शास्री यांनी संघाचे मनोबल टिकवून ठेवले, संघाचे मनोबल खचेल असे कोणतेही विधान केले नाही की तसे निर्णय घेतले नाहित असे विहारीने म्हटले आहे.
विहारी सांगतो, पहिल्या कसोटी सामन्यात तीनच दिवसात मार खाल्ल्यानंतरही रवी सरांनी ज्या पध्दतीने संघ हाताळला, ते पाहता आम्ही अतिशय वाईटरित्या हरलो आहोत हे कधीही त्यांनी जाणवू दिले नाही. पहिल्या कसोटीतही तुम्ही बघाल तर पहिल्या दोन दिवसांच्या खेळावर आपलाच वरचष्मा होता पण एका खराब सत्राने सारे होत्याचे नव्हते केले पण त्यांनी आम्ही अतिशय खराब कामगीरी केलीय हे कधीही जाणवू दिले नाही. त्यांनीच उलट सांगितले की दोन दिवस सामन्यावर आपले वर्चस्व होते हे आपण बघू या. असे सकारात्मक विचार त्यांनी संघासमोर ठेवले. त्यांनी संघाशी बैठकीत किंवा हडलमध्ये बोलताना नेहमीच पाॕझिटिव्ह गोष्ट केली, आम्हाला हिंमत दिली, ताकद दिली. त्यांनी नेहमीच आम्हाला सांगितले की मैदानात उतरा आणि तुम्ही तुमचे काम करा. इतर गोष्टींचा विचार करू नका. आमच्यावर दाखवलेल्या या विश्वासासाठी त्यांना श्रेय द्यावे तेवढे थोडेच आहे. ते नेहमीच सांगत आलेकी तुम्हाला अनुभव आहे की नाही हे महत्वाचे नाही, टीम इंडिया म्हणून तुम्ही मैदानात उतरता आहात हे लक्षात ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यांच्या या विश्वासानेच आम्हाला लढण्यास प्रेरीत केले. पहिला सामना गमावल्यावर तो पूर्णपणे विसरुन ही मालिका चार नाही तर तीनच सामन्यांची आहे असे समजून आम्ही खेळलो असेही विहारीने सांगितले. शांत व संयमी कर्णधार अजिंक्य रहाणेबद्दलही त्याने प्रशंसोद्गार काढले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला