
मुंबई : शिवसेना (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांचे सुपुत्र विहंग सरनाईक (Vihang Sarnaik) अखेर पाच तासाच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी मात्र प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे या चौकशीत त्यांच्याकडून ईडीने काय माहिती जाणून घेतली याबाबतची माहिती मिळू शकली नाही.
आज पहाटे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि दहा ठिकाणांवर ईडीने छापे मारले होते. सरनाईक यांचे चिरंजीव विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावरही छापे मारण्यात आले. यावेळी ईडीने सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयातील कागदपत्रे, मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घेतले. तब्बल चार तासांच्या धाडसत्रानंतर ईडीने दुपारी ३ वाजता विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं होतं.
त्यानंतर विहंग यांना मुंबईतील ईडीच्या कार्यालयात आणून त्यांची तब्बल पाच तास चौकशी केली. यावेळी त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगसह त्यांचे व्यवसाय आणि उत्पन्नाचे स्त्रोत या अनुषंगाने प्रश्नांचा भडिमार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पाच तासांच्या प्रश्नांच्या सरबत्तीनंतर विहंग यांची सुटका करण्यात आली. ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यावर प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना विहंग यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी थेट घर गाठले. त्यामुळे ईडीने त्यांना काय प्रश्न विचारले हे अद्याप कळू शकलेले नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला