मनसे घेणार शिवसेनेची जागा, राज ठाकरेंच्या आवाजात शिवरायांचा संदेश प्रसारित

Shivaji-Maharaj-And-Raj-Thackeray

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनाची जोरदार तयारी सध्या सुरु आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्त 23 जानेवारीला मनसेचं पहिलचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. मात्र त्याआधीच मनसेने दोन व्हिडीओ प्रसारित केला आहे. या व्हिडिओला स्वतः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आवाज दिला आहे.

या दोन्ही व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहेत. छत्रपतींच्या लढाईसाठी प्रत्येक जातीचा माणूस लढत होता असा आशय एका व्हिडिओमध्ये आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सगळ्या पक्षांचा आदर्श हे छत्रपती होते असा आशय आहे. एकूणच शिवसेनेची स्पेस घेण्याचा जोरदार प्रयत्न आता मनसेने सुरू केल्याचं दिसतं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच झेंडा बदलणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आता मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन पक्षाचा जुना झेंडा गायब झाला आहे. चार रंगाच्या झेंड्यावर रेल्वे इंजिनचे चिन्ह होते. मात्र आता फक्त रेल्वे इंजिनच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मनसेच्या झेंडाबदलाच्या चर्चेने आणखीनच वेग पकडला आहे. तर दुसरीकडे मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा असल्याची शक्यता संभाजी ब्रिगेडने वर्तवली आहे. मात्र मनसेच्या नव्या झेंड्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे.

मनसेला आलेली मरगळ झटकण्यासाठी आणि पक्ष संघटन पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी राज ठाकरे यांनी पक्षाचं महाअधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात राज ठाकरे अनेक मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. याच अधिवेशनात मनसेच्या नव्या झेंड्याचं लॉन्चिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे झेंडा बदलत मनसे कात टाकणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.