परदेशात राहणार्‍या दांपत्याच्या विवाहाची ‘व्हिडीओ‘ नोंदणी

Video Registration Of Marriage - Punjab and Haryana High Court - Maharashtra Today
  • पंजाब व हरियाणा हायकोर्टाकडून दिलासा

चंदीगड : नोकरीनिमित्त पती लंडनमध्ये व पत्नी अमेरिकेत राहात असलेल्या एका भारतीय दांपत्याच्या विवाहाची नोंदणी, त्यांना प्रत्यक्ष हजर राहायला न सांगता, ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून करण्याचा आदेश पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने (Punjab and Haryana High Court) दिला आहे.

मूळच्या हरियाणातील गुरुग्राम येथील असलेल्या अमी राजन आणि मिशा वर्मा या दांपत्याने केलेले अपील मंजूर करून न्या. रितू बाहरी आणि न्या. अर्चना पुरी यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. आधी विवाह नोंदणी अधिकाऱ्याने व नंतर एकल न्यायाधीशाने नियमांवर बोट ठेवून तसे करण्यास नकार दिल्याने हे अपील केले गेले होते.

खंडपीठाने म्हटले की, विवाह नोंदणीसाठी दांपत्याने आणि वरपक्ष व वधूपक्षाकडील साक्षीदारांनी प्रत्यक्ष हजर राहण्याचा नियम आहे हे खरे. नोंदणी करण्यासाठी आलेले व प्रत्यक्षात विवाह झालेले पती-पत्नी नक्की तेच आहेत याची खात्री करण्यासाठी हा नियम केलेला आहे. आज तंत्रज्ञानातील प्रगतीने हजारो किमी लांब असलेल्या व्यक्तीच्या ‘व्हर्चुअल’ हजेरीने नियमाचे काटेकोर पालन न करताही त्याचा हेतू साध्य करणे शक्य आहे. त्यामुळे नियम पाळून गैरसोय होत असेल तर अपवादात्मक परिस्थितीत सोयीसाठी नियम थोडा शिथिल केला जाऊ शकतो.

खंडपीठाने असेही म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार वि. डॉ. प्रफुल्ल देसाई या प्रकरणात मुंबईत सुरू असलेल्या फौजदारी खटल्यात अमेरिकेतील एका डॉक्टरची ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’ने साक्ष नोंदविण्याची मुभा दिली होती. एरवीही फौजदारी खटल्यांत जेव्हा न्यायालय ‘कमिशन’ नेमून साक्ष नोंदविते तेव्हाही साक्षीदार प्रत्यक्षपणे न्यायालयासमक्ष हजर नसतो. हीच पद्धत विवाह नोंदणीसाठीही अनुसरली जाऊ शकते.

पती अमी राजन आणि दोन साक्षीदारांनी विवाह नोंदणी अधिकाऱ्यापुढे जातीने हजर राहावे आणि पत्नी मिशा शर्मा हिने अमेरिकेतून ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून हजर राहावे. त्यानंतर कागदपत्रांची शहानिशा करून विवाह नोंदणी अधिकाऱ्याने अमी व मिशा यांच्या विवाहाची रजिस्टरमध्ये रीसतर नोंदणी करून त्यांना विवाहाचे नोंदणी प्रमाणपत्र जारी करावे, असा आदेश दिला गेला.

अमी ‘आयटी’ अभियंता असून लंडनमध्ये नोकरी करतो तर डॉक्टर असलेली मिशा अमेरिकेच्या व्हजिर्निया राज्यात एका इस्पितळात निवासी डॉक्टर आहे. अमी व मिशा यांचा डिसेंबर २०१९ मध्ये गुरुग्राम येथे विवाह झाला. विवाहानंतर काही दिवसांनी दोघेही आपापल्या नोकरीच्या ठिकाणी गेले. जानेवारी २०२० मध्ये त्यांनी विवाह नोंदणीसाठी आॅनलाईन अर्ज केला. त्यांना विवाह नोंदणीसाठी एप्रिलमध्ये जातीने हजर राहण्यास सांगण्यात आले. परंतु ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्याने त्यांना हजर राहणे शक्य झाले नाही. शिवाय मिशाला अमेरिकेत कोविडची ड्युटी लागल्याने तिला अमेरिका सोडणे अशक्य झाले. अमीने तिला भेटायला अमेरिकेत जायचे म्हटले तरी ‘व्हिसा’साठी त्याला विवाह दाखला देणे गरजेचे होते. अशा अडचणीत त्यांनी विवाहाच्या ‘व्हिडीओ’ नोंदणीची विनंती केली होती.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER