इंदोरीकर महाराजांच्या ‘त्या’ कीर्तनाचा व्हिडीओ यू-ट्यूबवर उपलब्ध नाही !

- सायबर सेलच्या निर्वाळ्याने महाराजांना दिलासा

Maharaj Indurikar

अहमदनगर : इंदोरीकर महाराजांच्या कथित आक्षेपार्ह कीर्तनाचा कोणताही व्हिडीओ यू-ट्यूबवर उपलब्ध नाही, असा निर्वाळा सायबर सेलने दिल्याने महाराजांना दिलासा मिळाला आहे. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, “सम तिथीला स्त्रीसंग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते.” असे विधान ओझर येथे झालेल्या कीर्तनात त्यांनी केलं होतं. त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेतल्यानं गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनीही अशीच मागणी केली होती. नगरमध्ये पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन महाराजांविरोधात लेखी तक्रार दिली होती. त्यांच्याविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती. गुन्हा दाखल न झाल्यास इंदोरीकर महाराजांच्या तोंडाला काळं फासू, असा इशाराही दिला होता. आता सायबर सेलने असा व्हिडीओ यू-ट्यूबवर उपलब्ध नाही, असा निर्वाळा दिल्याने महाराजांच्याविरोधातील तक्रारींचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सक्षम पुरावे नसल्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार नाही, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा इंदोरीकरांसाठी मोठा दिलासा आहे.

दरम्यान, वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांनी पाठवलेल्या नोटिशीला उत्तर देताना – मी तसं बोललोच नाही, असं इंदोरीकर म्हणाले. ‘यू-ट्युबला आम्ही काही टाकत नाही आणि रेकॉर्डिंगदेखील करत नाही. मी तसं वक्तव्य केलं नाही.’ असा खुलासा इंदोरीकर महाराजांनी केला होता.