विदर्भातील पालखीला परवानगी नसल्याने वारकरी उपोषणाला बसणार

Vidarbha Warkari

अकोला : आषाढी एकादशीनिमित्त विठोबाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पायी पंढरपूरला जात असतात. सध्या संपूर्ण देश कोरोनाशी लढा देत असून, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सरकारने लॉकडाऊन लागू केला आहे. संपूर्ण धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. अशातच २९ मे रोजी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, मानाच्या सहा पालख्यांना हेलिकॉप्टर, विमानाने किंवा वाहनाने पंढरपूरला पालखीतील पादुका आणि काही वारकरी नेण्याची परवानगी देण्यात आली आहे; पण या सहा पालख्यांमध्ये विदर्भातील एकाही पालखीचा समावेश नसल्याने विदर्भातील वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विदर्भातील पालखीला परवानगी मिळावी यासाठी दोनदा राज्य सरकारला मेलद्वारे आणि पत्राद्वारे विनंती करण्यात आली.

मात्र सरकारकडून कुठलेही उत्तर मिळाले नाही. संबंधित व्यक्तीशी दूरध्वनीवर संपर्क केला असता, उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले. या सरकारला विदर्भातील वारकऱ्यांप्रती सहानुभूती नाही हे स्पष्ट होते. मात्र वारकरी असा दुजाभाव कदापि सहन करणार नाही. सरकारने आमच्या मागणीकडे लक्ष घातले नाही तर येत्या १३ जूनपासून आम्ही आमरण उपोषणाला बसू, असा इशारा विदर्भातील वारकरी मंडळांनी दिला आहे. विदर्भातील अनेक लोकप्रतिनिधींनी याबाबत सरकारशी पत्रव्यवहार केला; मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता आम्हाला उपोषणाला बसण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही, असे विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी सांगितले. १३ जूनपासून अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे सामाजिक अंतराचे पालन करून साखळी उपोषणाला सुरुवात होणार असून, यात विदर्भातील सर्वच वारकरी मंडळांचे प्रमुख सहभागी होतील अशी माहिती शेटे यांनी दिली.

वारकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
आई रुक्मिणी माता पालखी सोहळ्यामध्ये पाच वारकरी आणि इतर १५ पालख्यांसोबत प्रत्येकी दोन वारकरी अशा एकूण ३५ वारकऱ्यांना परवानगी द्यावी, सरकारने दोन शिवशाही बसेस द्याव्या, जेणेकरून नियमांचे पालन करून वारकरी पंढरपूरला वारीला जातील, पंढरपूरला फक्त एक दिवस थांबायची व्यवस्था करावी, पुढच्या वर्षी आषाढी वारीच्या नियोजन बैठकीला विदर्भातील प्रतिनिधी स्वरूपात लेखी आमंत्रण द्यावे, सध्या पूर्ण भारतातील मंदिरे उघडली; पण पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर अजूनही बंद आहे, मंदिर त्वरित उघडण्यात यावे, पंढरपूर येथील व्यावसायिक व वारकरी संप्रदायातील कीर्तनकार मंडळांना आर्थिक मदत द्यावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER