विदर्भातील नेत्यांना राणेंच्या पक्षप्रवेशात रस नाही

नागपूर : काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर नवा पक्ष स्थापन करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पक्षाच्या बळकटीसाठी विदर्भातून मोहिम सुरू करण्याचे जाहीर केले आहे. मात्र त्यांनी स्थापन केलेल्या नव्या पक्षात जाण्यास विदर्भातील ज्येष्ठ नेत्यांना रस नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे राणेंना विदर्भाकडून असलेली अपेक्षा पूर्ण होणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

घटस्थापनेच्या दिवशी काँग्रेस पक्षातून राजीनामा दिल्यानंतर राणे यांनी काँग्रेस व शिवसेनेच्या विरोधात नागपुरातून मोहिम सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांचा दौऱ्याची तारीख अद्यापही निश्चित झालेली नाही. आता राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला आहे. राणे शिवसेनेत असताना त्यांचे विदर्भात अनेक आमदार समर्थक होते. राणे यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा विदर्भातील दोन आमदारही त्यांच्यासोबत आले होते. यात काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार (ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर) व प्रकाश भारसाकडे (दर्यापूर जि. अमरावती) यांचा समावेश होता.

आमदार वडेट्टीवार अद्यापही काँग्रेसमध्ये आहेत व विधानसभेतील उपनेते आहेत. प्रकाश भारसाकडे आता भाजपमध्ये आहेत. आता ते पुन्हा राणेंच्या मागे जाण्याची शक्‍यता नाही. आमदार वडेट्टीवार यांनी राणे यांच्यापासून अंतर राखणे पसंत केले आहे. प्रकाश भारसाकडे भाजपमध्ये नाराज असले तरी ते राणेंना साथ देण्याची कुठलीही शक्‍यता नाही. काँग्रेसमधील असंतुष्ट असलेले माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व नितीन राऊत यांनीही राणेंसोबत जाण्यावर नकारात्मक भूमिका घेतली आहे.

काँग्रेसमध्ये असताना राणेंनी नागपुरात या असंतुष्टांची भेट घेतली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना प्रदेश अध्यक्ष पदावरून हटविण्याच्या अभियानाला राणे यांनी समर्थन दिले होते. काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांनी राणेंसोबत जाण्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. विदर्भातून राणेंना मदत मिळणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपुरातील एक माजी नगरसेवक व युवक काँग्रेसचा माजी अध्यक्ष अजय हिवरकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. इतरांनी मात्र आद्यपपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.