विदर्भातही संततधार, नद्यांना पूर

Vidarbha-Main

पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस सुरू असल्याने समाधान आहे. नदीनाले ओसंडून वाहात आहेत. काही भागांत पूर आला आहे.


नागपूर :- पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस सुरू असल्याने समाधान आहे. नदीनाले ओसंडून वाहात आहेत. काही भागांत पूर आला आहे.

पावसाचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात  ४८ तासांपासून संततधार सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त नरखेड तालुक्यात चांगला पाऊस बरसला. छोट्या नद्या आणि नाल्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली. जलालखेडा – वरूड मार्गावर भारसिंगीजवळ जाम नदी फुगली.  त्यामुळे काही काळ वाहतूक बंद झाली होती. नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त काटोल तालुक्यातही काल जोरात पाऊस झाला. मात्र, दुष्काळ जाहीर झालेल्या कळमेश्वर तालुक्यात समाधानकारक पाऊस नाही. पिकं आणि पिण्याच्या पाण्याची स्थिती चिंताजनक आहे.

ही बातमी पण वाचा : पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री धावले, १० ऑगस्टला होणारा नेत्यांचा पक्ष प्रवेशही रद्द?

नागपूर जिल्ह्यातील नरखेड, काटोल आणि कळमेश्वर या तीन तालुक्यांत  दुष्काळ जाहीर झाला आहे. यातील नरखेड आणि काटोल तालुक्यांत  कालपासून चांगला पाऊस झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे. काल रात्री अचानक नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने १०० पेक्षा जास्त घरं आणि ४० हून अधिक दुकाने पाण्याखाली गेली आहेत. पाण्याची पातळी अजूनही वाढते आहे. भामरागड शहर चारही बाजूने पाण्याने वेढले गेले आहे.

प्रशासनाने पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्याचं काम रात्रीपासून सुरू केलं. आलापल्ली-भामरागड मार्गावरील कुमरगुडा नाल्याच्या पुरामुळे रस्ता बंद झाला आहे.

दरम्यान आजही  (८ ऑगस्ट) पावसाचा इशारा देण्यात आला असून पाऊस झाल्यास भामरागडला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.