बंगालमधील विजयाने भाजपचे राज्यसभेतील संख्याबळ वाढणार

West Bengal Elections - Rajya Sabha - BJP

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये भाजपला सत्ता मिळू शकली नसली तरी तेथे पक्षाचे ८० आमदार जिंकल्यास राज्यसभेत भाजपचे संख्याबळ वाढणार असून राज्यसभेत बहुमत नसल्याची पक्षाची खंत दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. भाजपला २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ तीन जागा पश्चिम बंगालमध्ये मिळाल्या होत्या. त्यामुळे भाजपचा एकही राज्यसभा खासदार निवडून आलेला नाही. आता किमान दोन राज्यसभा सदस्य बंगालमधून भाजपतर्फे निवडून जातील अशी स्थिती आहे. आॅगस्ट २०२३ मध्ये बंगालमध्ये विधानसभेतून राज्यसभेवर सहा सदस्य निवडून देण्यासाठी निवडणूक होत आहे. त्यावेळी भाजपचा बंगालमधून पहिला राज्यसभा सदस्य निवडून येईल. पुढील पाच वर्षांत पश्चिम बंगालच्या विधानसभेतून राज्यसभेवर सदस्य पाठवण्यासाठी निवडणूक होईल तेव्हा भाजपला संधी असेल.

राज्यसभेचे सध्या २३७ सदस्य असून भाजपचे ९५ सदस्य आहेत. भाजपचे मित्रपक्ष व भाजप मिळून ११० संख्याबळ राज्यसभेत आहे. त्यात अण्णाद्रमुकचे नऊ, बिजू जनता दलाचे सहा सदस्य आहेत. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पहिल्या कार्यकाळात राज्यसभेत भाजपचे संख्याबळ फारच कमी होते आणि त्यामुळे अनेक कायदे मंजूर करवून घेताना भाजपला कसरत करावी लागली. लोकसभेत भक्कम बहुमत असूनही राज्यसभेत बहुमत नसल्याने अडचणी येत गेल्या. या लोकसभेत पहिल्यापेक्षा भाजपची परिस्थिती खूपच चांगली आहे; पण तरीही बहुमत नाही. २०१९ पूर्वी भाजपचे राज्यसभेतील संख्याबळ केवळ ७३ इतके होते. आसाममध्ये भाजपने पुन्हा एकदा सत्ता संपादन केली आहे आणि भाजप व मित्रपक्षांना विधानसभेत मिळालेल्या जागा लक्षात घेता तेथे भाजप (BJP) काँग्रेसकडून (Congress) राज्यसभेची एक जागा हिसकावून घेईल, असे दिसते. मात्र तामिळनाडूत अण्णाद्रमुक व भाजपला पराभव पत्करावा लागला. द्रमुक आणि काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाल्याने तेथे भविष्यात अण्णाद्रमुक म्हणजे पर्यायाने भाजप मित्रपक्षाच्या राज्यसभा जागा कमी होऊ शकतात. राज्यसभेचे संख्याबळ २४५ इतके आहे. त्यातील २३३ हे विविध राज्यांमधून आणि केंद्रशासित प्रदेशांमधून निवडून जातात तर १२ सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button