अखेर यशवंत सिन्हा यांनी आंदोलन मागे घेतले , मुख्यमंत्र्यांनी केल्या सर्व मागण्या मान्य!

अकोला : येथे शेतकऱ्यांच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात सुरु असलेले आंदोलन आज मागे घेण्यात आले आहे. आज यशवंत सिन्हा आणि मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून झालेल्या चर्चेदरम्यान सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळे यशवंत सिन्हा यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.

अकोला येथील पोलीस मुख्यालयात गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात आंदोलन करीत आहेत. या तीन दिवसांदरम्यान यशवंत सिन्हा यांना विविध पक्षांचा आंदोलनास पाठिंबा मिळाला. यावेळी तृणमुल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी आले होते.याचबरोबर, शेकापचे प्रदिप देशमुख, अ. भा. छावाचे रणजीत काळे, छावा संघटनेचे शंकर वाकोडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह आंदोलनस्थळी दाखल होऊन आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला. भोकरदनचे जिल्हा परिषद सदस्य केशव पाटील जवंजाळ, मुंबईचे उद्योजक एकनाथ दुधे यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी आंदोलनात सहभागी झाले होते. याचबरोबर, आम आदमी पार्टीच्या प्रिती मेनन यांनीही यशवंत सिन्हांची भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे देखील त्यांच्या सहकाऱ्यांसह अकोल्यात येऊन यशवंत सिन्हा यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

विविध पक्षांच्या पाठिंबामुळे सरकारने शेतक-यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतला.तसेच, आता कोणत्याही शेतक-यांनी आत्महत्या करू नये. या आंदोलनामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या हा शेतक-यांचा विजय आहे. आम्ही केलेल्या मागण्या सर्व राज्यातील शेतक-यांच्या हिताच्या असल्यामुळे सर्वांचाच फायदा होईल, असे सिन्हा म्हणाले. सरकाने आमच्या मागण्या मान्य केल्यामुळे आंदोलन मागे घेतले जात आहे. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी आता घरी परत जावे, असे सिन्हा यांनी जाहीर केले. याचबरोबर, जरी सरकारने मागण्या मान्य केल्या असल्या, तरी सरकारने अंमलबजावणीत कसूर केली तर आम्ही पुन्हा आंदोलन करू, असा इशाराही यावेळी सिन्हा यांनी सरकारला दिला.

नाफेडचे उडीद, मूग, सोयाबीन व तूर विक्रीसाठी असलेले क्लिष्ट नियम बदलून, शेतक-यांचा शेतमाल हमीभावाने विकत घ्यावा, आर्थिक अडचणीतून शेतक-याला बाहेर काढण्यासाठी शासनाने सर्व शेतमालासाठी भावांतराची योजना लागू करावी, कपाशीवरील बोंडअळीचा सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतक-यांना एकरी ५० हजार नुकसान भरपाई द्यावी, शेतक-यांना व्याज व दंडासह आकारलेले अवाजवी वीज देयक पाठविले आणि वीज तोडणी सुरू केली. हे थांबवून शेतक-यांना दिलासा द्यावा, पीक विमा तातडीने देण्यात यावा आणि त्यावर तोडगा काढावा, अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून, दुष्काळी अनुदान द्यावे, सोनेतारण कर्जमाफीपासून वंचित ३५ हजार शेतक-यांना न्याय द्यावा, कर्जमाफी फसवी असल्यामुळे या योजनेला दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदलावे आणि शेतक-यांच्या मुलांची तीन वर्षांपासून थकीत शिष्यवृत्ती द्यावी, या मागण्यांसाठी यशवंत सिन्हा यांनी आंदोलन पुकारले आहे.