विकी कौशल बनणार ‘अश्वत्थामा’

Vicky Khausal

सिनेमांमध्ये छोट्या-छोट्या भूमिकांमधून स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवत विकी कौशलने अल्पावधीतच बॉलिवुडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. संजय दत्तच्या जीवनावर आधारित संजू सिनेमातील संजय दत्तच्या मित्राची त्याने साकारलेली भूमिका केवळ प्रेक्षकांनाच नव्हे तर बॉलिवुडमधील अनेक निर्मात्यांनाही आवडली होती. त्यामुळेच विकीकडे मोठ्या बॅनरचे सिनेमे चालून आले होते. उरी घटनेवर आधारित त्याच्या सिनेमाने तर बॉक्स ऑफिसवर कमाईचा विक्रम केला होता. विकी कौशल आता एका वेगळ्या म्हणजेच ‘अश्वत्थामा’च्या भूमिकेत दिसणार असून हा सिनेमा नाव जरी पौराणिक असले तरी आधुनिक म्हणजेच साय-फाय सिनेमा आहे. हा सिनेमाही ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ ज्यांनी बनवला तीच टीम बनवत आहे.

2018 मध्ये आदित्य धरच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ ने बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. एवढेच नव्हे तर या सिनेमाला तीन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते. या सिनेमाचा नायक विकी कौशल, दिग्दर्शक आदित्य धर आणि निर्माता रॉनी स्क्रूवाला पुन्हा एकदा ‘अश्वत्थामा’ सिनेमासाठी एकत्र आले आहेत. काल या सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला. फर्स्ट लुक पाहिल्यानंतर हा एक साय-फाय सिनेमा असून यातील मुख्य भूमिका ही महाभारतातील अश्वत्थामा या पात्रावरून घेतल्याचे दिसत आहे.

या सिनेमाबाबत बोलताना दिग्दर्शक आदित्य धरने सांगितले, आमच्या उरी सिनेमाला प्रेक्षकांचे खूपच प्रेम मिळाले होते आणि आजही हा सिनेमा पाहिला जात आहे. हा सिनेमा हिट झाल्याने आमच्यावरील जबाबदारीही वाढली आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या कसोटीवर उतरत काही तरी चांगले आणि नवे देण्याबाबत आम्ही विचार करीत होतो. त्यातूनच हा एक आगळावेगळा सिनेमा आकाराला आला आहे. ‘अश्वत्थामा’त असे स्पेशल इफेक्ट्स दाखवणार आहोत जे भारतीय प्रेक्षकांनी यापूर्वीही कधीही पाहिलेले नाहीत. भारतीय प्रेक्षकांसाठी हा सिनेमा म्हणजे केवळ एक सिनेमा नव्हे तर एक अनुभव ठरणार आहे.

सिनेमाचा निर्माता रॉनी स्क्रूवालाने अश्वत्थामा’चा पहिला लुक जारी करताना मला खूप आनंद होत आहे असे सांगितले. राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या ब्लॉकबस्टर ‘उरी’ सिनेमाची टीम पुन्हा एकत्र येणार म्हटल्यानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. आणि आम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणार आहोत. यावर्षीच आम्ही या सिनेमाचे शूटिंग सुरु करणार आहोत. हा आमचा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. जगभरात या सिनेमाच्या माध्यमातून भारतीय सिनेसृष्टीची ताकद दाखवण्याचा आमचा विचार आहे.

विकीनेही या सिनेमाबाबत बोलताना सांगितले, हा सिनेमा माझ्या आतापर्यंतच्या सिनेमापैकी सगळ्यात भव्य दिव्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केला जाणार सिनेमा आहे. ‘अश्वत्थामा’ हा दिग्दर्शक आदित्य धरचा ड्रीम प्रोजेक्ट असून एक अभिनेता म्हणून या सिनेमात काम करण्याचा एक नवा अनुभव मला मिळणार आहे. तसेच या सिनेमाच्या निमित्ताने मला आधुनिक तंत्रज्ञानाची माहितीही मिळणार आहे. त्यामुळे हा सिनेमा कधी तयार होतो आणि रिलीज होतो याची मला स्वतःलाच उत्सुकता लागलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER