विक्की कौशल आणि भूमी पेडणेकरलाही कोरोनाची लागण

Maharashtra Today

संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर आली असून महाराष्ट्रात तर कोरोनाने उच्छाद मांडला आहे. रोज हजारोंच्या संख्येने नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद होऊ लागली आहे. यावेळी तर कोरोनाने बॉलिवूडलाही सोडलेले नाही. गेल्या काही दिवसात २० ते २५ कलाकारांना कोरोनाची लागण झाली असून अजूनही बॉलिवूड (Bollywood) कलाकार कोरोनाची शिकार होताना दिसत आहेत. अक्षयकुमार आणि गोविंदानंतर आता अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांनीही सोशल मीडियावर त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती फॅन्सबरोबर शेअर केली आहे.

भूमी पेडणेकरने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे, माझी कोविड-१९ टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सध्या लक्षणे साधारण आहेत. मी ठीक असून स्वतःला आयसोलेट केले आहे. माझे डॉक्टर आणि हेल्थ प्रोफेशनल्स यांनी माझ्यासाठी जो प्रोटोकॉल दिला आहे त्याचे मी पालन करीत आहे. तुमच्यापैकी कोणी जर माझ्या संपर्कात आला असेल तर त्यांनी वेळ न दवडता स्वतःची कोविड-१९ टेस्ट करून घ्यावी. स्टीम, व्हिटॅमिन-सी, योग्य आहार आणि आनंद राहणे मी याचे पालन करीत आहे. तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही या गोष्टीला हलक्यात घेऊ नका. सगळ्या प्रकारची काळजी, सुरक्षितता घेऊनही मला कोरोनाची लागण झाली आहे. मास्क घाला, सतत हात धूत राहा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि स्वतःच्या वागणुकीवर लक्ष ठेवा असेही भूमीने तिच्या या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अभिनेता विक्की कौशलनेही सोशल मीडियावर त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. विक्कीने लिहिले आहे, सगळ्या प्रकारची काळजी आणि सुरक्षितता घेऊन आणि सर्व नियमांचे पालन करूनही मला कोरोनाची लागण झाली आहे. मी सध्या कोरोना नियमांचे पालन करीत आहे. घरातच क्वारंटाईन झालो असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी त्यांचीही कोविड-१९ टेस्ट करून घ्यावी असेही त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

कलाकारांना कोरोनाची लागण होऊ लागल्याने सरकारने जरी शूटिंगची परवानगी दिली असली तरी कलाकारच क्वारंटाईन असल्याने अनेक सिनेमांचे शूटिंग रखडले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button