राज्यात लवकरच फिरते पशु चिकित्सालय सुरु करणार – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

सांगली :- पशुधन हे शेतकऱ्यांचे कुटुंब असून, पशुधनाच्या आरोग्यासाठी आणि जोपासणेसाठी राज्यात लवकरच फिरते पशु चिकित्सालय सुरु केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी इस्लामपुरात बोलताना केली.

लोकनेते राजारामबापू पाटील यांचा छत्तिसावा स्मृतिदिन आणि जन्मशताब्दी जन्मशताब्दी वर्ष या निमित्त राजारामबापू पाटील सहकारी दूधसंघाच्यावतीने 24 कोटी 40 लाख रूपये खर्चून उभारलेल्या दूध भुकटी प्रकल्पाचे व राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत उभारलेल्या पशुखाद्य प्रयोग शाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील राज्य उत्पादन शुल्क , पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई, सहकार, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार धैर्यशील माने, आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबूले आदी मान्यवर उपस्थित होते.

पशुधनाची जोपासणा करणे सर्वार्थाने महत्वाचे असून त्यांना पोषक पशुखाद्य, औषधोपचार, चारा आदी गोष्टी वेळीच उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही देवून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, फिरत्या पशु चिकित्सालय उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर राज्यात विभागनिहाय पशु चिकित्सालये सुरु करण्याचा मानस आहे. शेतकऱ्यांसाठी जे – जे करणे शक्य आहे, ते करण्यासाठी आपलं सरकार वचनबध्द राहील. हे सरकार कोणताही सूड उगवणारे नसून, जे चांगले आहे, ते टिकवणं, वाढवणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कारभार करेल.

राज्यातील शेतकरी मेहनती व कष्टाळू असून तो ऊन, वारा व पाऊस याची तमा न बाळगता अहोरात्र शेतात राबतो आहे. अशा माझ्या शेतकऱ्याला सहाय्य करण्याची संधी मला मिळाली असून ती निश्चितपणे पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. राज्यातील सहकार क्षेत्र अजिबात मरु देणार नाही.

लोकनेते राजारामबापू पाटील हे एक विद्यापीठच होते, अशा शब्दात बापूंच्या कार्याचा गौरव करुन ठाकरे म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक परिवर्तनास चालना दिली. त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी नवनवे प्रयोग करुन शेतकऱ्यांना विकासाची नवी दालने उपलब्ध करुन दिली. त्यांच्या विचार आणि कार्याची परंपरा जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि त्यांचे कुटुंबिय यशस्वीपणे जोपासत आहेत.

या प्रसंगी बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, राजारामबापू सहकार व उद्योग समुहाच्या माध्यमातून हजारो हातांना काम मिळाले असून त्यामुळे परिसराचा चेहरा मोहरा बदलला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेवृत्वाखाली राज्यातील शासनही शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि विकासासाठी कटीबध्द आहे. प्रारंभी राजारामबापू दूध संघाचे चेअरमन विनायकराव पाटील यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात दूध संघाच्या प्रगतीचा आढावा घेतला.