यंदाच्या मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सज्ज! पवारांना देणार ‘सहस्रचंद्रदर्शना’ची खास भेट

Sharad Pawar

नाशिक : महाराष्ट्राच्या निर्मितीला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने मायमराठीचा गजर सांस्कृतिक नगरी असलेल्या नाशिकमध्ये निनादावा, या उद्देशाने साहित्य महामंडळाला प्रस्ताव पाठवला आहे. औरंगाबादच्या बैठकीत काय निर्णय होतो, त्याकडे आता लक्ष आहे. संमेलन आम्हाला मिळाले तर ते यशस्वी करून दाखवू असे लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले यांनी म्हटले आहे. संमेलन आयोजित करण्याच्या नाशिकच्या प्रस्तावावर आज, रविवारी औरंगाबादमध्ये होणाऱ्या महामंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना त्यांच्या सहस्रचंद्रदर्शनाची ‘विशेष भेट’ या संमेलनाच्या रूपात दिली जाणार असल्याची चर्चा मराठी साहित्य वर्तुळात सुरू आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) आपल्या सहकारी पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचार-प्रसाराच्या बाबतीत आघाडी घेतली आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचता येईल, अशी प्रत्येक संधी साधण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते. शरद पवारांचा ८० वा वाढदिवस नुकताच झाला. त्यालाही अतिशय नियोजनपूर्वक ‘इव्हेंट’चे स्वरूप देण्यात आले होते. आता साहित्य संमेलनाकडेही तशाच संधीच्या रूपात पाहिले जात आहे.

त्यामुळेच अखिल भारतीय मराठी संमेलनासाठी गेल्या वर्षी प्रस्ताव पाठवणारे नाशकातील सार्वजनिक वाचनालय यंदा इच्छुक नसल्याचे कळताच नाशकातीलच लोकहितवादी मंडळाने क्षणाचाही विलंब न लावता प्रत्यक्ष औरंगाबादला जाऊन आपला प्रस्ताव सादर केला. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे माजी आमदार हेमंत टकले हे लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त आहेत. ते शरद पवारांचे ‘निकटवर्तीय’ मानले जातात. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री आहेत. लगोलग त्यांनाही यजमानपदाची माहिती पोहचविण्यात आली. त्यामुळे नाशिकच्या प्रस्तावाला आपोआपच ‘वजन’ प्राप्त झाले असून  औरंगाबादेत होणाऱ्या बैठकीत नाशिकच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची केवळ औपचारिकता शिल्लक असल्याचे सांगितले जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER