एकेकाळी पवारांचे विश्वासू असलेले दिग्गज नेते सुधाकरपंत यांचे निधन

Sudhakar Pant

पंढरपूर : सर्वांचे आधार, ज्येष्ठ नेते, आणि पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर पंत (Sudhakar Pant) परिचारकयांनी पुण्यातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुधाकरपंत यांनी काल रात्री (१७ ऑगस्ट) साडेअकराच्या सुमारास पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गेल्या आठ दिवसांपासून उपचार सुरु होते. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. परिचारक यांनी २५ वर्ष महाराष्ट्र विधानसभेची आमदारकी भूषवली होती.

सुधाकरपंत परिचारक गेल्या २ दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. त्यांचे सर्व अंत्यविधी कोरोनाच्या नियमावलीत पुणे येथे पार पडतील, अशी माहिती नातू प्रितीश परिचारक यांनी फेसबुकवरुन दिली आहे. गेली ५० वर्षे ज्यांचा आधार पूर्ण जिल्ह्याला होता त्यांना आज आपल्या प्रार्थनेच्या आधाराची गरज आहे, अशी भावनिक पोस्ट प्रितीश परिचारक यांनी दोनच दिवसांपूर्वी केली होती. “तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून सर्वोत्तम उपचार चालू आहेत.

सुधाकरपंत परिचारक यांचा परिचय

सुधाकरपंत परिचारक यांनी २५ वर्ष महाराष्ट्र विधानसभेची आमदारकी भूषवली होती. परिचारक यांनी २०१९ मध्येही शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. सुधाकरपंत परिचारक यांना एकेकाळी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवारांचे (Sharad Pawar) विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जायचे. त्यांनी पाच वेळा पंढरपूरमधून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कामही पाहिले होते. मात्र, वयोमानामुळे गेल्या दहा वर्षात त्यांचा राजकीय संपर्क कमी झाला होता. २००९ मध्ये सुधाकरपंत परिचारक यांना विधानसभेची उमेदवारी जाहीरही झाली होती. मात्र ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी पंतांनी उमेदवारी मागे घेतली. परंतु मोहिते पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या दहा वर्षांच्या काळात सुधाकरपंत निवडणुकांपासून लांब राहिले. पंचाहत्तरी गाठल्यानंतर इतरांना संधी देण्यासाठी सुधाकरपंतांनी ‘बॅक टू पॅव्हेलियन’ करणं पसंत केलं होतं. २०१४ च्या निवडणुकीपासून परिचारकांनी राष्ट्रवादीसोबतही काडीमोड घेतला. मात्र कार्यकर्त्यांचा जोश पाहून गेल्या वर्षी सुधाकरपंतांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER