द्रष्टे गंगाधर गाडगीळ आणि किडलेली माणसे

Covid

Shailendra Paranjapeकोरोनाचा (Corona) रोग केवळ विषाणूसंसर्ग झालेल्या रोग्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. कोरोनाच्या संकटामध्ये संधी शोधून सुधारणा करण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर तसेच सामाजिक पातळीवर आणि प्रशासकीय पातळीवरही अनेक धडे कोरोनाच्या साथीनं सर्वांनाच दिले आहेत.

कोरोनासारख्या साथीच्या रोगामध्ये लसविकसन, त्याचे टप्पे हेही जगभर प्रचलित असलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच आहेत. पण तरीही वेळोवेळी आम्ही लस आणतोय, आमची लस या काळात येईल, आमची लस इतक्या रुपयांना मिळेल, आम्ही केंद्र सरकारच्या सहकार्याने सर्व भारतीयांना लस इतक्या पैशात देऊ अशा आशयाच्या बातम्या प्रसारित करून काही हितसंबंधीयांनी वेळोवेळी प्रसिद्धीही मिळवलीय. अशा लोकांना त्याच वेळी कळीचे प्रश्न विचारून संशोधन जर इंग्लंडमधल्या विद्यापीठात होत असेल तर तुम्ही का नाचताय, असा प्रश्न विचारला गेला नाही. तसेच लस आणतोय म्हणता तर इंग्लंडचे विद्यापीठ आणि संबंधित औषधनिर्माण कंपनी यांच्याशी तुमचा नेमका काय करार किंवा एमओयू झालाय, हे विचारले गेले नाही ना त्याची प्रतही उपलब्ध केली गेली.

एकीकडे कंपन्यांच्या प्रसिद्धीसारखे प्रकार कोरोना काळात बघायला मिळाले तसेच आधी जीवनावश्यक वस्तू मग प्राणवायूचा काळा बाजार करणारेही महाभाग बातम्यांमधून दिसलेत. हे सारे म्हणजे मागच्या पिढीतील लेखक गंगाधर गाडगीळ यांच्या `किडलेली माणसे’ या कथेतील किडलेली माणसेच आहेत. या किडलेल्या माणसांमध्ये आता भर पडलीय ती रेमडिसिव्हरचा काळा बाजार करणाऱ्यांची. सामान्यपणे औषधांचा काळा बाजार, इंजेक्शनचा काळा बाजार असं म्हटलं की त्या उद्योगातले नोटोरियस किंवा नेहमीचे यशस्वी गुन्हेगार किंवा अपप्रवृत्ती यांच्याकडे आपल्या मनाचा अंगुलिनिर्देश असतो; पण रेमडिसिव्हरच्या काळ्या बाजाराबद्दल पुण्यातल्या स्थानिक वृत्तपत्रातून आलेल्या बातमीमधून मुळात कोरोनावर औषध नसताना डॉक्टरांकडून वाढत्या प्रमाणात हे इंजेक्शन प्रिस्क्राइब केले जातेय, हे लक्षात येतेय. या काळ्या बाजारात अपप्रवृत्तींना भौगोलिक सीमा नसतात, हेही सिद्ध झालंय. कोरोनाचा विषाणू किंवा कोरोनाचा फैलाव जसा ग्रामीण भागातही होऊ लागलाय आणि तो चिंताजनक पद्धतीने वाढला तोच प्रकार रेमडिसिव्हरच्या काळ्या बाजाराबद्दलही झालाय. काळ्या बाजाराला बळी पडणाऱ्यांमध्ये आता पुण्याच्या आणि एकूणच राज्याच्या ग्रामीण भागातले नागरिक वाढू लागले आहेत आणि ही खूपच चिंतेची बाब आहे.

रेमडिसिव्हरचे पाच-साडेपाच हजार रुपयांचे इंजेक्शन आता दीडपट किमतीला विकत घ्यावे लागत आहे. तेही मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक वणवण फिरताहेत आणि कुठूनही हे इंजेक्शन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात औषध दुकानदारांच्या संघटनेने तसेच काही दुकानदारांनीही हे स्पष्ट केलेय की सकाळी रेमडिसिव्हरचा स्टॉक येतो आणि तो संध्याकाळी संपतो; कारण रुग्णांना रेमडिसिव्हर घ्या, असा सल्ला दिला जातोय.

मुळात कोरोनावर जगात औषध उपलब्धच नाहीये तर मग विशिष्ट इंजेक्शन, विशिष्ट औषधे यांचा अट्टहास का केला जातोय… त्या त्या इंजेक्शन औषधांची कृत्रिम टंचाई निर्माण करून रुग्णांना, त्यांच्या नातेवाइकांना लुटायचा तर हा डाव नाही ना…आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अत्यवस्थ रुग्णांना रेमडिसिव्हर मोफत द्या, असं सांगितलंय. त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर या पद्धतीनं आता सरकारी रुग्णालयात किंवा तथाकथित जम्बो कोविड सुविधेमध्ये पुरविले गेलेले रेमडिसिव्हर त्याची प्रत्यक्ष आणि लावली गेलेली किंमत, असं नवं प्रकरणही पुढे येणार का, अशी चिंता लागून राहते.

म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर. स्थानिक वृत्तपत्रातील बातमीनुसार औषध दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या ग्रामीण भागात तर सर्रासपणे रेमडिसिव्हर लिहून दिले जात असल्याने या इंजेक्शनची मागणी काही पटींनी वाढलीय. या क्षेत्रातल्या किडलेल्या माणसांसाठी ही कोरोना काळातली सुवर्णसंधी निर्माण करून देणारे, त्यासाठी येनकेनप्रकारेण साहाय्यभूत ठरणारे सगळेच गंगाधर गाडगीळ यांच्या किडलेल्या माणसांमध्ये गणना होण्याच्या लायकीचे आहेत.

त्यामुळे कोरोना परवडला पण ही किडलेली माणसे नकोत, असं वाटण्यासारखी स्थिती दर आठवड्यात निर्माण होतेय. त्यामुळे कोरोनानं विविध पातळ्यांवर दिलेल्या विकासाच्या सुधारणांच्या संधींप्रमाणेच समाजातली किडलेली माणसेही शोधायची संधी भविष्यातल्या संशोधकांसाठी उपलब्ध करून दिलीय. गंगाधर गाडगीळ यांनी छोट्याशा कथेतून दाखवून दिलेल्या समाजातल्या अपप्रवृत्तींचं दर्शन या पिढीतही घडतंय, याचा अर्थ आपण प्रगती केलीय की…

Disclaimer : – ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER