ऋषीजी तुम्ही पुनर्जन्म घ्या; लता दीदींचे भावुक ट्विट

Lata Mangeshkar - Rishi Kapoor Video

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर गुरुवारी अनंतात विलीन झाले. त्यांच्या निधनानं केवळ चाहत्यांनाच नाही तर सिनेसृष्टीतल्या दिग्गज कलाकार मंडळींना देखील धक्का बसला आहे. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी पुन्हा ट्विट करून ऋषी कपूर यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

या ट्विटवरून असे दिसते की , लता दीदी ऋषी कपूर यांच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही सावरल्या नाहीत. ऋषी कपूर तुम्ही पुनर्जन्म घेऊन परत या असेही त्या म्हणाल्या आहे . लता दीदींनी ‘ओम शांती ओम’ या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे . त्यासोबत त्यांनी लिहीलेले कॅप्शन लक्ष वेधून घेत आहे. ‘ऋषीजी मला तुमची फार आठवण येतेय. असा विचार करणे वेडेपणाचे असू शकते पण ‘कर्ज’ चित्रपटाप्रमाणे तुम्ही पुनर्जन्म घेऊन परत आलात तर किती बरे होईल’, असे लता दीदींनी म्हटले आहे.

दरम्यान, ऋषी यांच्या निधनानंतर लता दीदींनी एक खास फोटो शेअर करत ऋषी कपूर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला होता. आपल्या हातावर घेतलेल्या गोंडस लहानग्या ऋषी कपूर यांच्या फोटोसह, ‘काही दिवसांपूर्वीच ऋषींजींनी मला त्यांचा हा फोटो पाठवला होता. फोटोतला तो दिवस, त्यावेळच्या कितीतरी गोष्टींची आठवण येतेय. मी नि:शब्द झाले आहे,’ अशा भावना आपल्या ट्विटरवर व्यक्त केल्या होत्या .