ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचे निधन

Veteran Bollywood actor Nimmi passes away

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री निम्मी यांचे वयाच्या ८८ वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. निम्मी यांना श्वसनाचा त्रास होता. त्यांना जुहू येथील निवास्थानाजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांच्या निधनाची दु:खद बातमी दिली आहे. गुरुवारी दुपारनंतर मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बॉलिवूडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रीचे मूळ नाव नवाब बानो असे होते. राज कपूर यांनी स्क्रीनवर त्यांना निम्मी या नावाने नवी ओळख दिली. १९४९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बरसात’ या चित्रपटातून निम्मी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरला होता. त्यानंतर त्यांनी राज कपूर, देव आनंद, दिलीप कुमार यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले.

१९५२ मध्ये मेहबूब यांच्या ‘आन’ या त्याकाळच्या बिग बजेट चित्रपटात काम करण्याची संधी त्यांना लाभली. या चित्रपटामध्ये दिलीप कुमार, प्रेम नाथ आणि नादिरा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सूरय्या, गीता बाली, मधूबाला, मीना कुमारी या आघाडीच्या अभिनेत्रींसोबत निम्मी यांचे नाव घेतले जायचे. दिलीप कुमार यांच्यासोबत त्यांचा ‘दिदार’ आणि ‘दाग’ हे चित्रपटांनाही प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली होती. निम्मी यांनी लेखक अली राजा यांच्यासोबत विवाह केला होता. त्याचे २००७ मध्ये निधन झाले होते.