ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन

Saroj Sukhtankar

कोल्हापूर : मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळया भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सरोज धोंडीराम सुखटणकर यांचे बुधवारी, ता. २३ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८४ वर्षाच्या होत्या. त्या, हातकणंगले तालुक्यातील रुई येथे वास्तव्यास होत्या.मराठी नाटक, सिनेमात त्यांनी अभिनयाचा ठसा उमटविला होता.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने २००६ मध्ये चित्रकर्मी पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. शिवाय राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने २०१७-१८ मध्ये त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान केला होता.

लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती.रुई येथील ‘न्यू भारत नाट्य क्लब’मधून त्यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली.. सुरुवातीच्या काळात त्यांनी रंगभूमीवर काम केले.‘वेगळं व्हायचय मला, मुंबईची माणसं, प्रेमा तुझा रंग कसा, दिवा जळू दे सारी रात, तुझं आहे तुझपाशी’ या नाटकात काम केली. त्यांनी ८५ हून अधिक मराठी सिनेमात भूमिका केल्या आहेत. यामध्ये ‘बाई मी भोळी,कुंकवाचा करंडा, जोतिबाचा नवस, सून लाडकी या घरची, कौल दे खंडेराया, एकटा जीव सदाशिव,सोयरिक, अष्टविनायक, भिंगरी, सावज, सहकार सम्राट, तोतया आमदार,भुजंग, धुमधडाका,लेक चालली सासरला, दे देणादण, बळी राजाचे राज्य येऊ दे’अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. ‘धनगरवाडा’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा तर ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतही त्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER