आयपीएलमध्ये सर्वात पहिल्या चेंडूवर दोनदाच निघालीय विकेट तर एकदाच चौकार!

Maharashtra Today

आयपीएल 2021 (IPL 2021)  म्हणजे 14 व्या सत्राचा पहिला चेंडू आज संध्याकाळी टाकला जाईल. कोणताही क्रिकेट सामना असो की स्पर्धा असो, त्यातील पहिल्या चेंडूबद्दल फारच उत्सुकता असते, कुतुहल असते.

18 एप्रिल 2008 रोजी आयपीएलच्या इतिहासातील पहिला चेंडू (First Ball)  टाकला गेला बंगळुरुच्या (Bengaluru)  चिन्नास्वामी मैदानावर. त्यावेळी आरसीबीच्या (RCB)  प्रवीण कुमारने (Praveen kumar)  टाकलेल्या पहिल्या चेंडूवर दादा सौरव गांगुली (Saurav Ganguly)  स्ट्राईकला होता. पहिल्याच चेंडूवर लेगबायची पहिली  धाव निघाली होती. त्या पहिल्या षटकात तीन धावा निघाल्या पण एकही धाव बॕटीने निघाली नव्हती. दोन धावा लेगबायच्या होत्या आणि एक वाईडची. पहिली धाव निघाली ती आठव्या चेंडूवर आणि तो होता चौकार. झहीर खानच्या गोलंदाजीवर ब्रेंडन मॕक्क्युलमने तो लगावला होता. मॕक्क्युलम तेवढ्यावरच थांबला नाही तर 4,4,6,4 असे फटके लगावत त्याने त्या षटकात 18 धावा वसूल केल्या.

आयपीएलच्या इतिहासात अगदी पहिल्याच चेंडूवर केवळ तिनदा जबरदस्त नाट्य घडले आहे. दोनदा अगदी पहिल्या चेंडूवर विकेट पडली आहे तर एकदाच चौकार लागला आहे.

2010 च्या आयपीएलचा जो पहिलाच चेंडू होता त्यावर डेक्कन चार्जर्सच्या चामिंडा वासने केकेआरच्या मनोज तिवारीची विकेट काढली होती. त्याने त्याला रोहित शर्माकडून झेलबाद केलं होतं.

2013 च्या आयपीएलच्या पहिल्याच चेंडूवर दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या उन्मुक्त चंदचा केकेआरच्या ब्रेट लीने त्रिफळा उडवला होता. हे दोन प्रसंग वगळता आयपीएलमधील सर्वात पहिल्या चेंडूवर अद्याप विकेट गेलेली नाही.

2020 म्हणजे गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सर्वात पहिला चेंडू सीमापार झाला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने चेन्नई सुपर किंग्जच्या दीपक चाहरला चौकार लगावला होता. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात पहिल्या चेंडूवर एकही षटकार लागलेला नाही.

आता पुन्हा एकदा आयपीएलचा रोमांच सुरु होणार आहे. आणि यावेळी पहिल्या चेंडूवर काय होणार, चौकार लागणार की षटकार की विकेट निघणार…की काहीच नाही याची नेहमीप्रमाणे उत्सुकता आहेच.

.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button