उभी पिके वाहून गेली : मंत्री म्हणतात, ‘शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडे पैसे नाहीत’

Dadaji Bhuse-Farmers

औरंगाबाद : राज्यात मागील काही दिवसांत झालेल्याअतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे आठवडाभरात करा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना कृषिमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी दिले. असं असलं तरी कोरोनामुळे सरकारी तिजोरीत पैसा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. अशी कबुली त्यांनी दिली. मात्र शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पैसा उभा करू, असेही भुसे म्हणाले. तर दुसरीकडे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पुढील तीन महिने शेतकऱ्याला मदत करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील नागद, सायगव्हान येथे शेतात प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. यावेळी भुसे म्हणाले की, येत्या आठ दिवसांत जेथे जेथे नुकसान झाले त्या सर्व क्षेत्रांची पाहणी करण्याचे आदेश देऊन पंचनामे करण्यात येतील. प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळेल. खचून जाऊ नका, अतिवृष्टीमुळे किती नुकसान झाले याची आकडेवारी नाही. मात्र येत्या आठ दिवसांत ही आकडेवारी आमच्याकडे येईल आणि त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात बोलू. सध्याची कोरोनाची स्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना तत्काळ मदत करता येईल अशी परिस्थिती नाही. शासनाच्या तिजोरीत सध्या पैसा नाही, ही वस्तुस्थिती आहे, असं भुसे म्हणाले.

मात्र शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वाटेल ते करू; पण शेतकऱ्याला मदत करू, असंही ते म्हणाले. दुसरीकडे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीदेखील सोयगाव तालुक्यातील काही गावांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी नुकसानीच्या व्यथा सत्तार यांच्यासमोर मांडल्या. यावेळी एबीपी माझाशी बोलताना मंत्री सत्तार यांनीदेखील स्पष्ट म्हटलं आहे की, कोरोनाच्या संकटामुळे सरकारच्या तिजोरीत पैसा नाही. सर्व पैसा कोरोना उपचारांसाठी लावला जात आहे. पुढील तीन महिने तरी हा पैसा उभा करणं शक्य नाही. पण शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे वार्‍यावर सोडणार नाहीत. वेळप्रसंगी कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करू, असंही सत्तार म्हणाले.

यावेळी सत्तार यांनी दावा केला की, सोयगाव तालुक्यामध्ये पंचनाम्याला सुरुवात झाली आहे. मात्र ज्या शेतांमध्ये सत्तार नुकसानीची पाहणी करत होते त्याच शेतकऱ्यांनी मात्र अद्याप कुठलाही अधिकारी बांधावर आला नाही असं सांगितलं. यावेळी बोलताना सत्तार यांनी बोगस बियाणे विकणाऱ्या कंपनीच्या मालकावर कठोर कारवाई करून फाशी देण्याचा कायदा करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : देशातले शेतकरी हे ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पेनाचा कणा-पंतप्रधान नरेंद्र मोदी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER