पडताळणी, उलट तपासणी न करताच तपास केला बंद! पोलिसांनी न्यायालयाला दिली माहिती

- अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण

Anvay Naik-Arnav Goswami

रायगड :- अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणाच्या तपासात तत्कालीन पोलीस पथकाने जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्या. आरोपींना त्याचा फायदा व्हावा, हा उद्देश होता. आरोपींनी जबाबात जे तपशील सांगितले त्याची खातरजमा, पडताळणी किंवा उलट तपासणी न करताच ग्राह्य मानून ‘ए समरी’ अहवाल तयार केला गेला, अशी माहिती रायगड पोलिसांनी न्यायालयाला दिली.

वादग्रस्त रक्कम न देण्याबाबत आरोपींच्या कंपनीने जारी केलेल्या डेबिट नोटबाबत रायगड पोलीस साशंक असून त्यासोबत विविध पैलूंवर नव्याने तपास करणार आहेत.

अर्णव यांच्या पोलीस कोठडीची मागणी करताना रायगड पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, आधीच्या तपास पथकाने त्रुटी ठेवल्याने आरोपींना फायदा मिळाला. नाईक यांनी काम अर्धवट सोडले होते. ते अन्य कंत्राटदाराकडून पूर्ण करून घेतले आणि त्याचा मोबदला संबंधित कंत्राटदाराला दिला. नाईक यांच्या कंपनीला वेळोवेळी ‘डेबिट नोट’ जारी करून ते मागत असलेली रक्कम देणार नाही, असे कळवले होते, असा दावा अर्णव आणि त्यांच्या कंपनीतील प्रतिनिधींनी वारंवार केला होता. नोटीस जारी करणाऱ्यासोबत ती स्वीकारणाऱ्याची स्वाक्षरी असल्यासच अशा डेबिट नोटला कायदेशीर मान्यता प्राप्त होते. मात्र तपासात जप्त केलेल्या डेबिट नोटवर नाईक किंवा त्यांच्या कंपनीतील प्राधिकाऱ्याची स्वाक्षरी नाही. तसेच ही नोट नाईक यांच्या कंपनीने स्वीकारली, असा पुरावाही आढळलेला नाही.

प्रत्यक्षात दोन्ही कंपन्यांमधील व्यावहारिक बाबी ई-मेलद्वारे चर्चिल्या गेल्या. असे असताना अर्णव यांच्या कंपनीने नाईक यांना प्रत्यक्ष भेटून, ई-मेलद्वारे, स्पीड पोस्टने डेबिट नोट पाठवणे आवश्यक होते. मात्र यापैकी एकाही पर्यायाने डेबिट नोट नाईक यांच्या कंपनीपर्यंत पोहचलेली नाही. त्यामुळे ही नोट एकतर्फी होती, असा अंदाज आहे. तसेच नाईक यांनी अर्धवट सोडलेले काम कोणकोणत्या कंत्राटदारांकडून पूर्ण करून घेतले याची माहिती अटक आरोपी आणि त्यांच्या कंपनीतील अधिकाऱ्यांपैकी एकानेही आधीच्या तपास पथकाला दिली नव्हती किंवा तपास पथकाने ती मिळवून खातरजमा केलेली नाही, असे सांगण्यात आले.

‘ती’ चिठ्ठी तपासणीसाठी परीक्षकांकडे

आधीच्या तपास पथकाने अन्वय यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी दस्तऐवज परीक्षकांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आली होती. मात्र आतापर्यंत परीक्षकांचा अहवाल प्रलंबित आहे. नाईक यांचा मोबाईल न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. मात्र पॅटर्नमुळे तो उघडणे अशक्य असल्याची नोंद तपास अहवालात आढळते. या प्रकरणाचा नव्याने तपास हाती घेतल्यावर चिठ्ठीबाबतचा अहवाल प्राधान्याने मिळावा, याबाबत परीक्षकांना कळविले आहे.

नाईक यांचा मोबाईल पुन्हा न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. तसेच प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या त्यांच्या लॅपटॉपमध्ये दोन लाखांहून अधिक फाइल्स, एक हजारांहून अधिक ई-मेलच्या छायांकित प्रती काढून त्याचे विश्लेषण सुरू केल्याचा दावा रायगड पोलिसांनी न्यायालयात केला.

नव्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा नवे साक्षीदार पुढे आले आणि त्यांनी तपासाशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती, पुरावे पथकाला दिले. नाईक कुटुंबाने केलेल्या तक्रार अर्जात तथ्य असल्याचे हाती लागलेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होते, असा दावाही रायगड पोलिसांनी न्यायालयात केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER