
मुंबई :- अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate-ED) दाखल केलेल्या ‘मनी लॉड्रिंग’च्या खटल्यात व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यावस्थापकीय संचालक (CMD) वेणुगोपाळ धूत यांना येथील विशेष न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. आयसीआयसीआय बँकेकडून कंपनीच्या नावाने घेतलेली कर्जे अन्यत्र फिरवून पैशांचा अपहार केल्यासंबंधीचे हे प्रकरण आहे. याच खटल्यात आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (MD & CEO) चंदा कोचर याही आरोपी असून त्यांनाही न्यायालयाने काही दिवसांपूर्वी जामीन मंजूर केला होता.
‘मनी लॉड्रिंग’ प्रतिबंधक कायद्यासाठीच्या (PMLA) विशेष न्यायालयाने धूत यांना पाच लाखांचा जामीन मंजूर केला. पासपोर्ट अंमललबजावणी संचालनालयाकडे जमा करणे, कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडून न जाणे, बोलाविले जाईल तेव्हा चौकशीसाठी हजर राहणे आणि संपर्काचा ताजा तपशील देणे इत्यादी अटींवर हा जामीन देण्यात आला.
धूत यांच्यावतीने त्यांचे वकील अॅड. संदीप लढ्ढा यांनी गुणवत्तेवर तसेच प्रकृतीच्या कारणाने अशा दोन्ही दृष्टीने जामिनासाठी युक्तिवाद केला. धूत यांची प्रकृती खूपच नाजूक आहे तरी ते तपासात पूर्ण सहकार्य करीत आहेत. न्यायालयाने समन्स काढले तेव्हा ते औरंगाबाद येथे औषधोपचार घेत असल्याने येऊ शकले नाहीत.पण नंतर ते स्वत:हून न्यायालयात हजर झाले, असे ते म्हणाले. धूत यांनी बँकेचे किंवा कोणाचेही पैसे बुडविलेले नाहीत. उलट टेलिकॉम परवाने रद्द झाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला व त्यांनी त्यांच्या नफ्यातील कंपन्यांतून पैसे काढून तो खड्डा भरला, असेही लढ्ढा म्हणाले. अॅड. सुनील गोन्साल्विस यांनी ‘ईडी’साठी युक्तिवाद केला.
अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला