कर्नल वेंगसरकर भडकले, म्हणाले, “गांगुलींकडेच इतरांपेक्षा अधिक माहिती असते का?”

Sourav Ganguly - Dilip Vengsarkar

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) हे स्वतःच सर्व गोष्टी बोलून राष्ट्रीय निवडकर्त्यांना आणि आयपीएलचे (IPL) चेअरमन ब्रिजेश पटेल (Brijesh Patel) यांना डावलत तर आहेच, शिवाय त्यांचे महत्त्वसुध्दा कमी करत आहेत असा आरोप माजी कर्णधार व माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी केला आहे. यामुळे मंडळाचे अध्यक्ष म्हणून गांगुली यांच्यावरील आपला विश्वास कमी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वेंगसरकर यांनी म्हटले आहे की, आयपीएलच्या तारखा आणि आयोजन स्थळाची जेंव्हा चर्चा सुरु होती आणि आयपीएलचे आयोजन होत असतानाही आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांच्याऐवजी गांगुलीच बोलत होते. ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे आणि जे त्या निर्णयांबद्दल सर्व प्रकारची माहिती देऊ शकतात यांच्या कारभारात दुर्दैवाने ते वारंवार नाक खूपसत आहेत. त्यांचे महत्त्व कमी करण्याचा ते प्रयत्न करताहेत का? किंवा आपल्याला इतरांपेक्षा अधिक माहिती आहे असे त्यांना वाटते असा सवाल वेंगसरकर यांनी केला आहे.

संघ निवड किंवा खेळाडूंच्या फिटनेसच्या मुद्द्यांवर खरं तर राष्ट्रीय निवड समितीनेच बोलायला हवे पण त्यांच्याऐवजी मंडळाचे अध्यक्षच बोलत आहेत. राष्ट्रिय निवड समितीचे अध्यक्ष सध्या माजी फिरकी गोलंदाज सुनील जोशी आहेत. आॕक्टोबरमध्ये त्यांच्याच अध्यक्षतेत आॕस्ट्रेलियन दौऱ्यासाठी संघ निवड झाली पण अद्याप एकदाही जोशी संघनिवडीबद्दल काहीच बोललेले नाहीत.

गांगुली हे गेल्या वर्षभरापासून बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळत आहेत आणि तेच संघातून कुणाला का वगळण्यात आले, कुणाची निवड का झाली नाही, कुणाचा विचार का करण्यात आला नाही आणि कोणता खेळाडू कितपत तंदुरुस्त आहे याबद्दल बोलत आहेत.

कर्नल वेंगसरकर यांनी रोहित शर्माच्या वैद्यकीय अहवालांतील तफावतीवरसुध्दा बोट ठेवले आहे. रोहीत शर्माला पायाच्या नडगीच्या दुखापतीमुळे आॕस्ट्रेलियन दौऱ्यासाठी निवडण्यात आलेले नव्हते परंतु आता विराट कोहली लवकर माघारी परतणार असल्याने त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.

यासंदर्भात गांगुली यांनी गेल्याच आठवड्यात सांगितले की, रोहित शर्माच्या पायाची नडगी (hamstring) फाटली आहे आणि त्याला जर लवकर खेळवले तर ती पुन्हा फाटू शकते अशी भीती व्यक्त केली आहे. मात्र नंतर त्यांनीच म्हटले होते की, जर रोहीत सावरला तर तो आॕस्ट्रेलियात जाऊ शकतो. मात्र रोहित आयपीएलमध्ये याच दुखापतीसह खेळत असल्याकडे वेंगसरकर यांनी लक्ष वेधले आहे. जर भारतीय संघाच्या फिजिओंना तो अनफिट वाटतो तर मुंबई इंडियन्सच्या फिजीओने त्याला फिट कसे ठरवले? दोन फिजीओंच्या निरीक्षणात ही तफावत का, असा सवाल वेंगसरकर यांनी केला आहे. संघ निवडीत कुणाची चालतेय, निवडसमिती की मंडळाचे पदाधिकारी तेच कळत नाही असे वेंगसरकर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER