वेंगसरकर यांचे 1986 मधील हे शतक का आहे खास?

Dilip Vengsarkar

कर्नल दिलीप वेंगसरकर यांनी 1986 चा इंग्लंड दौरा आपल्या फलंदाजीने चांगलाच गाजवला होता. त्याच दौऱ्यात लागोपाठच्या दोन कसोटी सामन्यात, लॉर्ड्स व लीडस्, येथे त्यांनी शतकं झळकावली होती आणि भारताच्या मालिका विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यापैकी लॉर्ड्स येथील शतकाने ते ‘लॉर्ड ऑफ लॉर्ड्स ‘ ठरले होते तर लिडस् कसोटीतील त्यांचे शतक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठरले होते.

वैशिष्ट्यपूर्ण यासाठी की त्या सामन्यातील चारही डावातील ते एकमेव शतक होते. एवढंच नाही तर त्या सामन्यात कर्नल वेंगसरकर वगळता एकही फलंदाज अर्धशतकसुध्दा करु शकला नव्हता.

त्या सामन्यात वेंगसरकर यांच्या 102 धावांच्या खेळीनंतरची सर्वोच्च खेळी योगायोगाने वेंगसरकर यांचीच पहिल्या डावातील 61 धावांची होती आणि त्याखालोखाल सर्वात मोठी खेळी किरण मोरेच्या 36 धावांची होती.

कसोटी सामन्यांमध्ये एखाद्याने शतक केले पण इतर फलंदाजांपैकी कुणीही अर्धशतकसुध्दा करू शकले नाही, अशा केवळ सातच खेळी आहेत. त्यापैकी वेंगसरकर यांची ही एक खेळी आहे.

या सात वैशिष्ट्यपूर्ण खेळी पुढीलप्रमाणे (कंसात त्यानंतरची सर्वोच्च खेळी) –

1) जॉन रिड (न्यूझीलंड)- 100 वि. इंग्लड, ख्राईस्टचर्च 1963 (74- जॉन रीड, 47- केन बॅरिंग्टन)

2) ग्रॅमी वूड (ऑस्ट्रेलिया)- 100 वि. इंग्लंड, मेलबर्न 1978 (किम ह्युजेस-48).

3) इयान बोथम (इंग्लंड)- 114 वि. भारत, मुंबई, 1980. (सुनील गावसकर व ग्रॅहम गूच- 49)

4) दिलीप वेंगसरकर (भारत)- 102 वि.इंग्लंड, लिडस् 1986 ( 61- दिलीप वेंगसरकर, 36- किरण मोरे)

5) अँडी फ्लावर (झिम्बाब्वे) – 113 नाबाद वि. वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन 2000. (शिवनारायण चंद्रपाल 49)

6) कुमार संगकारा (श्रीलंका)- 157 नाबाद वि. वेस्ट इंडिज, कँडी 2005. ( दिलशान तिलकरत्न 49)

7)दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका)- 158 वि. दक्षिण आफ्रिका, गोल 2018 (फाफ डू प्लेसिस 49)


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER