
रत्नागिरी(प्रतिनिधी): मंडणगड तालुक्यातील व्याघ्रेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील किनाऱ्यावर काढलेला गाळ पावसात पुन्हा पात्रात जाऊन अडकल्याने ‘पाण्यात गाळ की गाळात पाणी’ अशी धरणाची स्थिती झाली आहे. यंदा हे धरण विविध कारणांनी चर्चेत असून धरणाला लागलेली गळती व गाळामुळे यंदा धरणात पाणीसाठा असताना या धरणाच्या प्रभावातील वेळास, बाणकोट, वाल्मिकीनगर ही तीन गावे पाण्याअभावी अडचणी सापडली आहेत.
वेळास येथील धरणाने अनेक वर्षे तीन गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. मात्र यंदा ऐन उन्हाळ्यात धरणात पाणीसाठा असतानाही मधल्या यंत्रणेत दोष असल्याने बाणकोट व वाल्मिकीनगर येथे पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून या दोन गावांना दुसरे समर्थ पर्याय उपलब्ध नसल्याने धरणातील गळतीचा दोष व गाळाची समस्या मार्गी लावण्याची आवश्यकता आहे. संबंधितांनी याची दखल घेण्याची मागणी या ग्रामस्थांमधून केली जात आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला