वाझे, प्रदीप शर्मा अशांना शिवसेना जवळची का वाटते?

Sachin Vaze - Shiv Sena - Pradeep Sharma

मुंबई :- एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) हा तब्बल १७ वर्षे निलंबित होता. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मध्यंतरी एक स्फोटक खुलासा केला होता की, सचिन वाझेचे (Sachin Vaze) निलंबन मागे घ्यावे यासाठी शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्याला आपण  मुख्यमंत्री व गृहमंत्री असताना फोन केला होता. यावर आपण राज्याचे महाधिवक्ता यांच्याकडून अहवाल मागविला होता आणि वाझेला पोलीस सेवेत पुन्हा घेणे उचित होणार नाही, असा अभिप्राय त्यांनी दिला. त्यामुळे आपल्या काळात वाझेचे निलंबन रद्द केले नाही. याच वाझेने २००५ ते २००७ या काळात त्याचे निलंबन मागे घेतले जावे यासाठी खूप प्रयत्न केले; पण त्यात यश आले नाही. २००८ मध्ये शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात त्याने शिवसेनेत प्रवेश केला होता.

एन्काउंटर स्पेशालिस्ट असे ज्यांचे वर्णन करण्यात आले  अशा अधिकाऱ्यांचे शिवसेनेला आणि या अधिकाऱ्यांना शिवसेनेचे नेहमीच आकर्षण का राहिले? सचिन वाझे याच्याप्रमाणेच प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) हेदेखील एक एन्काउंटर स्पेशालिस्ट. दोघांचीही कारकीर्द वादग्रस्त राहिली. दोघांच्या प्रामाणिकपणाबद्दल नेहमीच शंका उपस्थित करण्यात आल्या. दोघांनाही निलंबित व्हावे लागले आणि दोघांमध्ये समानता म्हणजे दोघेही शिवसेनेत गेले. प्रदीप शर्मा यांनी २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक नालासोपारामधून लढविली होती. मात्र बहुजन विकास आघाडीचे (Bahujan VIkas Aghadi) क्षितिज ठाकूर (Kshitij Thakur) यांनी त्यांचा दारुण पराभव केला होता.

एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी अरुण गवळीचे कौतुक केले होते. ‘तुमचा दाऊद असेल तर आमचा अरुण गवळी आहे’ हे त्यांचे वाक्य फारच गाजले होते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले शिवसेनेचे नगरसेवक के.टी.थापा यांची भांडुप मुंबईमध्ये छोटा राजन टोळीने पेट्रोल पंपाजवळ काही वर्षांपूर्वी हत्या केली होती. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची हत्या अरुण गवळी गँगने केली. त्या हत्येतच गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली. कुख्यात अमर नाईकची पत्नी अंजली नाईक हीदेखील शिवसेनेत होती. अश्विन नाईकची पत्नी नीता नाईक शिवसेनेची नगरसेविका होती. तिचीदेखील हत्या करण्यात आली होती. दंगलीच्या काळात दिगंबर कांडरकर या शिवसेना नगरसेवकाकडे शस्त्रास्त्रे  सापडली होती. त्याला अटक करण्यात आली. त्याची सुटका झाल्यानंतर शिवसेनेने त्यांचा सत्कार केला होता.

शिवसेना सुरुवातीपासूनच प्रचंड आक्रमक राहिली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) आज खळखट्याकची भाषा करतात. शिवसेनेने ती वर्षानुवर्षे वापरली. रांगड्या शिवसैनिकांच्या तोडफोड वागण्याचे नेहमीच समर्थन केले गेले. त्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना शिवसेना आपली वाटत गेली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनाही हा पक्ष जवळचा वाटत आला आहे.

ही बातमी पण वाचा : गडकरींनी तक्रार केली तो बजरंग हाच परबांचा सचिन वाझे बरं का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button