
मुंबई : मनसुख हिरेन हत्याप्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) ला माहिती मिळाली आहे की, सचिन वाझे (Sachin Waze) यांने मनसुख हिरेनची (Mansukh Hiren) हत्या का केली.
‘एनआयए’ (NIA)ने यासंदर्भात नुकताच एका पोलीस कॉन्स्टेबल आणि एका हॉटेल व्यावसायिकाचा जबाब नोंदवून घेतला. हे दोन्ही जबाब आणि मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांनी दिलेली माहिती याआधारे एनआयएने याचा छडा लावला आहे.
अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्यानंतर सचिन वाझे यांनी मनसुख हिरेनला आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. मी तुला दोन-तीन दिवसांत जामिनावर बाहेर काढेन, असेही वाझे म्हणाले होते. मनसुखने ही गोष्ट पत्नीला सांगितली.
वाझे यांनी वारंवार सांगूनही मनसुख हिरेन आत्मसमर्पण करायला तयार नव्हता. मी ही केस का डोक्यावर घेऊ, असे म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली होती. नंतर मनसुख हिरेन घरी निघून गेला.
दरम्यान, २ मार्च रोजी हे प्रकरण चौकशीसाठी एसीपी नितीन अलकनुरे यांच्याकडे सोपवण्यात आले. नितीन अलकनुरे स्कॉर्पिओचा मालक म्हणून मनसुख हिरेनला चौकशीसाठी बोलावतील हे स्पष्ट होते. नितीन अलकनुरे यांनी मनसुख हिरेनचा जबाब घेतला तर सर्व गोष्टी उघड होतील, अशी भीती सचिन वाझे याला वाटली.
त्यामुळे ४ मार्चला विनायक शिंदे याने बनावट सीम वापरुन मनसुख हिरेनला फोन केला. मी पोलीस अधिकारी तावडे बोलतो, असे सांगून मनसुखला घोडबंदर येथे बोलवून घेतले. त्यानंतर मनसुख हिरेनची हत्या करुन त्याचे शव खाडीत फेकून दिले. मनसुख हिरेन याने एसीपी अलकनुरे यांच्यासमोर खरा जबाब नोंदवू नये म्हणून सचिन वाझे याने त्याचा काटा काढला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला