वसमत: नागरी असुविधांबाबत वसमतकरांचा संताप; 4 नगरांच्या नागरीकांचा मतदानावर बहिष्कार

vasmat

वसमत/ तालुका प्रतिनिधी: नागरी सुविधा पुरवण्यात न.प.वसमत व लोकप्रतिनिधी असमर्थ ठरल्याने शहरातील चार नगराच्या मतदारांनी विधानसभा निवडणूक 2019 च्या निवडणुकीसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

शहरातील चार नगरातील लोकांनी निवडणूक विभाग वसमतला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की शहरातील नगर परिषद अंतर्गत येणार्‍या प्रभाग 13 व 14 मधिल भोरिपगाव रोड तिरुपती नगर,स्वामी समर्थ नगर,महारुद्र नगर, साईनगर या कॉलनीमध्ये गेली पंधरा वर्षापासून अनेक जण कुटुंबासह राहात आहे परंतु आमच्या भागात कोणत्याही मूलभूत सुविधा पिण्याचे पाणी, लाईट,रस्ते,नाल्याची व्यवस्था आदी नागरी सुविधा अद्याप पुरवण्यात आलेल्या नाहीत
याच परिसरातील नागरिक लोकसभा-विधानसभा स्थानिक नगर परिषदेच्या निवडणुकीत नियमित मतदान करीत असताना सुद्धा आम्हास स्थानिक नगर परिषदेकडे समाविष्ट करण्यात आलेले नाही किवा नागरी सुविधा बाबत अद्याप कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने सर्व नागरिकांनी एकत्र येऊन येत्या 21 ऑक्टोबर 2019 वसमत विधानसभा निवडणुकीसाठी च्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव एक मुखाने घेतला असल्या बाबतचा लेखी पत्र सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वसमत यांना दिले आहे निवेदनावर असंख्य लोकांच्या स्वाक्षर्‍या असून यावर काय तोडगा निघतो या कडे मतदारांच्या नजरा वळल्या आहेत.

सहाय्यक निवडणूक अधिकार्यांनी केली मतदान करण्याची विनंती-
सदर नागरिकांच्या समस्येबाबत मुख्याधिकारी यांना तात्काळ उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या असून सदर मतदारांचे मत परिवर्तन करून त्यांना मतदान करण्याची विनंती करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती ज्योती पवार यांनी दिली आहे.