‘आमचे शिवसैनिक शिवसेनेत परत आले’, गीते आणि बागुलांच्या प्रवेशावर उद्धव ठाकरेंचे उद्गार

CM Uddhav Thackeray

मुंबई : फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे पक्षप्रवेश होत नाहीत. हे आमचेच लोक आहेत. त्यावेळी होते आजही आहेत, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काढले. वसंत गीते आणि सुनील बागुल या नाशिकमधील नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज संध्याकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या दोन्ही नेत्यांनी हाती शिवबंधन बांधले. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मधल्या काळात ते दुसऱ्या पक्षात गेले होते. गीते आहेत, सुनील आहेत. अनुभवसमृद्ध होऊन ते परत आले आहेत. शिवसैनिक शिवसेनेत परत आले आहेत, मी त्यांचे स्वागत करतो. नाशिक हा शिवसेनेचा गड आहे. मधल्या काळात थोडी मतभिन्नता निर्माण झाली होती. इकडे तिकडे झालं होतं. पण आता ही जुनी-नवी मंडळी एकत्र आल्यानंतर नाशिकवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. कोरोनाच्या यंत्रणेवर लक्ष ठेवून होतो. आता बाहेर पडायला सुरुवात केली. पण अजून सभा समारंभांना परवानगी नाही. मधल्या काळात कोयनेला गेलो. आज गोसीखुर्दला गेलो. समृद्धी मार्गाची पाहणी केली. प्रकल्प पूर्ण झाले आहेत, काही प्रकल्प पूर्ण व्हायला आले आहेत. काही प्रगतिपथावर आहेत. प्रकल्पांना गती दिली गेली पाहिजे, यासाठी हे दौरे सुरू आहेत, असंसुद्धा उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER