वरुण धवन आजपासून सुरु करणार ‘भेडिया’चे शूटिंग

Bhedia

वरुण धवनने (Varun Dhavan) जानेवारीत त्याची बालमैत्रीण असलेल्या नताशा दलालबरोबर लग्न केले. लग्नाच्या एक महिन्यानंतर वरुण धवन पुन्हा कामावर परतला आहे. वरुण धवनने ‘भेडिया’ सिनेमा साईन केल्याची माहिती आम्ही तुम्हाला दिलीच होती. याच सिनेमाचे शूटिंग आजपासून अरुणाचल प्रदेश येथे सुरु होणार असून वरुण धवन आणि सिनेमाची टीम खाजगी विमानाने बुधवारीच अरुणाचल प्रदेशसाठी रवाना झाली होती. अरुणाचलला पोहोचल्यानंतर ‘भेडिया’च्या (Bhedia) टीमने बुधवारी रात्री अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांची भेटही घेतली. सिनेमात वरुण धवन रात्री रुप बदलणाऱ्या लांडग्याच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी राहुल रॉयने (Rahul Roy) ने ‘जुनून’ सिनेमात अशी भूमिका साकारली होती. हॉलिवू़डमध्ये या कथानकावर अनेक सिनेमे आलेले आहेत.

वरुण धवन शूटिंगसाठी अरुणाचल प्रदेशला रवाना झाल्याची माहिती सिनेमाची नायिका कृती सेननने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडियो टाकल्याने मिळाली. कृती सेनन सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असून तिच्या सर्व सिनेमांची माहिती ती देत असते. कृतीने नुकतेच अक्षयकुमार सोबतच्या बच्चन पांडे सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले. त्याची माहितीही तिने सोशल मीडियावर शेअर केली होती. कृती सेननने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये कृती सेननसह, वरुण धवन, अभिषेक बॅनर्जी आणि निर्माता दिनेश व्हिजन एका खाजगी जेटसमोर उभे असलेले दिसत आहेत. या फोटोंसह कृती सेनने लिहिले आहे, ‘भेडिया अरुणाचल प्रदेशात पोहोचला.’

कृतीने सोशल मीडियावर अरुणाचल प्रदेशला जात असतानाचे फोटो आणि व्हिडियो शेअर केल्यानंतर वरुण धवननेही लगेचच सोशल मीडियावर जेटमध्ये प्रवेश करतानाचा व्हीडियो शेअर केला आहे. या व्हीडियोसोबत भेडियाच्या शूटिंगसाठी अरुणाचल प्रदेशला जात असल्याचे सांगतानाच वरुण लांडग्याचा आवाज काढतानाही दिसत आहे. वरुणचा हा एक हॉरर-थ्रिलर सिनेमा असून याचे दिग्दर्शन अमर कौशिक करीत आहे. अमरने यापूर्वी दिनेश व्हिजनसह ‘स्त्री’ सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा पुढील वर्षी 14 एप्रिलला रिलीज केला जाणार आहे.

वरुण धवनसोबत कृती सेननचा हा दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी हे दोघे 2015 मध्ये आलेल्या रोहित शेट्टी दिग्दर्शत ‘दिलवाले’ सिनेमात एकत्र दिसले होते. मात्र सिनेमाचे मुख्य नायक-नायिका होते शाहरुख खान आणि काजोल. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष करामत दाखवू शकला नव्हता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER