वरुण धवन बनणार ‘भेडिया’

वरुण धवनने (Varun Dhawan) गोविंदाच्या सुपरहिट सिनेमा कुली नंबर वनची रिमेक असलेल्या आणि याच नावाने तयार झालेल्या सिनेमात गोविंदासारखी भूमिका करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला सारा अली खाननेही साथ दिली होती. मोठ्या पडद्यावर हा सिनेमा आला नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज करण्यात आला मात्र प्रेक्षकांनी याकडे पाठ फिरवली होती. एवढेच नव्हे तर या सिनेमासाठी वरुण प्रचंड ट्रोलही झाला होता. सिनेमा रिलीज झाल्यानंतर वरुणने त्याच्या बालमैत्रिणीशी नुकतेच अलिबाग येथे नातेवाईक आणि मोजक्या मित्रमंडळींसमोर लग्न केले. पत्नीचा पायगुण त्याला मानवला असून लगेचच त्याला एक सिनेमा मिळाला आहे.

राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि श्रद्धा कपूर (Shradhha Kapoor) सोबत ‘स्त्री’ आणि राजकुमार राव व सारा अली खान (Sara Ali Khan) सोबत ‘रुही’ सिनेमाची निर्मिती करणारा निर्माता दिनेश व्हिजनने (Dinesh Vijan) आणखी एका नव्या हॉरर सिनेमाला सुरुवात केली असून या सिनेमासाठी नायक म्हणून वरुण धवनला साईन केले आहे. ‘रुही’ सिनेमा पुढील महिन्यात थिएटरमध्ये रिलीज केला जाणार आहे. दिनेश व्हिजनने नव्या सिनेमात वरुणची नायिका म्हणून कृती सेननला (Kriti Senon) साईन केले. वरुण आणि कृती रोहित शेट्टीच्या ‘दिलवाले’ सिनेमानंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. या सिनेमाचे नाव ‘भेडिया’ असे ठेवण्यात आले असून याचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला एवढेच नव्हे तर सिनेमाच्या रिलीजची डेटही यासोबत घोषित करण्यात आली आहे.

एका घनदाट जंगलात एक माणसाचे अचानक लांडग्यात रुपांतर होताना या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. हा लांडगा म्हणजेच वरुण धवन आहे असे सांगितले जात आहे. कृती सेननची भूमिका काय असेल त्याबाबत मात्र चांगलीच गुप्तता पाळण्यात आली आहे. टीझरसोबत वरुण धवनने, ‘भेड़िया का प्रणाम स्त्री जी और रूही जी को’ असे लिहिले आहे. तसेच हा सिनेमा पुढील वर्षी 14 एप्रिल 2022 ला रिलीज केला जाणार असल्याचेही टीझरमध्ये घोषित करण्यात आले आहे.

‘भेडिया’मध्ये वरुण आणि कृतीसोबत अभिषेक बॅनर्जी आणि दीपक डोभरियाल महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन ‘स्त्री’ या सुपरहिट हॉरर-कॉमेडीचा दिग्दर्शक अमर कौशिक करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER