वर्षा उधळणार नृत्याचा गुलाल

Varsha usgaonkar

सध्या अनेक शहरांमध्ये निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. कोरोनामुळे (Corona) गेल्या वर्षभरामध्ये अनेक निवडणुका थांबवण्यात आल्या होत्या. आता निवडणुकांचं रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे अभिनेत्री वर्षा उसगावकर (Varsha Usgavkar) कुठल्या निवडणुकीचा गुलाल उधळण्याची तयारी करत नाहीय ना ? असा प्रश्न पडू शकतो. पण तसं नक्कीच नाही. वर्षा ३३ वर्षांनंतर उधळीत रे गुलाल सजणा या गाण्यावर थिरकणार आहे. गंमत जंमत या सिनेमामध्ये वर्षा उसगावकरवरच हे गाणं चित्रित केलं होतं. टिपऱ्यांच्या तालावर तीस वर्षांपूर्वी ज्या उत्साहात वर्षा उसगावकर नाचली होती त्याच उत्साहात आता वयाच्या पन्नाशीतही नाचण्यासाठी तयार झाली आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं या तिच्या मालिकेमध्ये 31 डिसेंबरला नव्या वर्षाच्या स्वागताचा खास एपिसोड शूट होणार आहे. या विशेष भागामध्ये शिर्के पाटलांच्या घरातील सगळेजण काही ना काही कला सादर करणार आहेत. त्यासाठीच वर्षा उसगावकर अर्थात ऑनस्क्रीन नंदिनी शिर्के पाटील या उधळीत येरे गुलाल सजणा या गाण्यावर नाचणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मालिकेतील वर्षा उसगावकरच्या सुनेची भूमिका करणारी गिरीजा प्रभू हिनेच या नृत्याची कोरिओग्राफी केली आहे. त्यामुळे पडद्यावर सासू-सुनेच्या रूपात दिसणाऱ्या वर्षा आणि गिरिजा यांची गुरू-शिष्याची केमिस्ट्री या नृत्याच्या माध्यमातून वर्षा उसगावकरच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

नव्वदच्या दशकात मराठी सिनेमातील देखणी अभिनेत्री अशी ओळख घेऊन आलेली वर्षा उसगावकर हिने अनेक मराठी सिनेमांमध्ये काम करत त्यांची कारकीर्द गाजवली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावरही वर्षा उसगावकर सक्रिय असते. महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर यांच्या विनोदी चित्रपटाच्या काळात वर्षा उसगावकरने मॉडर्न नायिका मराठी चित्रपटसृष्टीला दिली.

श्रीमंत बापाची लाडावलेली मुलगी अशा रुपातील अनेक भूमिका वर्षा उसगावकरला अतिशय समर्पक ठरल्या. मात्र जसजसा विनोदीपटांचा काळ ओसरला तशी वर्षा उसगावकर मराठी सिनेमापासून लांब गेली. मूळची गोवेकर असलेल्या वर्षा उसगावकरने विवाहानंतर अभिनयाच्या बाबतीत थोडी विश्रांती घेतली. दहा वर्षापूर्वी मन उधाण वाऱ्याचे या मालिकेच्या माध्यमातून वर्षा उसगावकरने पुन्हा कॅमेऱ्यासमोर येण्याचा निर्णय घेतला. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि वर्षा उसगावकरचे मित्र महेश कोठारे यांची ती मालिका होती त्यामुळे नाही म्हणणं शक्य नव्हतं. वर्षा सांगते, जवळपास दहा वर्षानंतर महेश कोठारे यांनी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेची घोषणा केली तेव्हा या मालिकेतील नंदिनी शिर्के पाटील या भूमिकेसाठी विचारलं. यावेळी देखील नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. शिवाय ही कथा कोल्हापुरात राहणाऱ्या कुटुंबाची आहे. माझं कोल्हापूरवर विशेष प्रेम आहे. कोल्हापूरी व्यक्तिरेखा साकारायला मला नेहमीच आवडतं. सध्या ही मालिका अतिशय उत्सुकतेच्या वळणावर आलेली आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये या मालिकेत काहीसं दुःखी वातावरण होतं. मात्र आता या मालिकेची नायिका गौरी सुखरूप असल्याचे कळल्यानंतर शिर्के पाटलांच्या घरात आनंदी वातावरण झाले आहे. शिवाय नववर्षाच्या उंबरठ्यावर छान कौटुंबिक कार्यक्रमदेखील मालिकेतल्या घरामध्ये होणार आहे. त्यासाठीच हा सगळा नृत्याचा घाट घातला आहे.

गंमत जंमत या सिनेमाच्या खूप साऱ्या आठवणी माझ्या मनात आजही आहेत. त्या काळामध्ये टिपऱ्यांच्या तालावर नृत्याचा एक ट्रेंड होता. त्यामुळे या सिनेमातही एक टिपरी नृत्य असावे असे ठरले. त्यातूनच उधळीत ये रे गुलाल सजणा हे गाणं तयार झालं. सिनेमानंतर पुन्हा कधी मी या गाण्यावर नाचेन असा विचार केला नव्हता पण मला पुन्हा या निमित्ताने हे नृत्य करायला मिळणार याचा आनंद आहे. मालिकेतील मी म्हणजे नंदिनी शिर्के पाटील ही साधारण पन्नास वर्षाची स्त्री म्हणून हे नृत्य करणार आहे त्यामुळे माझं मालिकेतील कॅरेक्टर काय आहे हे लक्षात घेऊन गिरीजाने कोरिओग्राफी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER