कोल्हापूर चपलांची विक्री वाढविण्यासाठी विविध उपक्रम : पीयुष गोयल

Kolhapur-Piyush Goyal

नवी दिल्ली : कोल्हापूर (Kolhapur) चपलांची विक्री वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा विचार आहे. थ्री आणि फाईव्ह स्टार हॉटेलसोबत शासन करार करुन याठिकाणी कोल्हापुरी चप्पल (Kolhapur Slipers) विक्रीसाठी खास शोकेस किंवा दालन सुरू करेल. येथे ठेवलेल्या चपला आवडल्यानंतर खरेदी करण्याची मुभा ग्राहकाला असेल. चामड्यासह कोल्हापुरी चपलांच्या विक्रीतून सुमारे साडेसात हजार कोटी रुपयांची निर्यात करण्याचे केंद्र शासनाचे उदिष्ट असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांनी एएनआय वृत्तसंस्थेला नुकतीच दिली.

देशभरातील एकूणच चमड्याच्या वस्तूंच्या विक्रीची सुमारे साडेसात हजार कोटी रुपयांची उलाढाल वाढविण्याबाबत केंद्रीय उद्योग मंत्रालय आराखडा तयार करत आहे. जगप्रसिध्द कोल्हापुरी चपलांचा यामध्ये खास अग्रक्रमाने समावेश असून या चप्पलांची थ्री आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये विक्रीसाठी व्यवस्था करण्यात येणार आहे.

शंभरटक्के कातड्यापासून बनणाऱ्या कोल्हापूरी चपला (पायतान) हा व्यक्तीमत्व रुबाबदार बनविणारा विषय आहेच, याशिवाय चपला घातल्यानंतर कडक उन्हाळ्यातही पायांना थंडपणा मिळतो, हे वैशिष्ट आहे. जिल्ह्यात चपलांच्या खरेदीविक्रीतून ३० कोटी रुपयांपेक्षा अधिकची वार्षीक उलाढाल होते. तर एकूण या व्यावसायाची वार्षीक उलाढाल सव्वाशे कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. जिल्ह्यात चपला तयार करुन उपजीविका करणारी साधारणत: दहा हजारावर कुटुंबे आहेत.

चामड्यांची टंचाई आणि वाढणारी किंमत यामुळे चपला निर्मितीवर मर्यादा आहेत. कोल्हापुरी पुडा, कोल्हापुरी फ्लॅट, वेणी चपलांना शहरी भागात तर कापशी चपलांना ग्रामीण भागात मागणी आहे. घडीच्या कोल्हापुरी चपलांना परदेशी मोठी मागणी आहे. स्वित्झर्लंड, अमेरिका, युरोप, इजिप्त, इटली या देशात कोल्हापुरी चपलांची प्रदर्शने भरविली जातात. अशा या जगप्रसिध्द कोल्हापुरी चपला आता यापुढे देशभरातील थ्री आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. अशा पध्दतीमुळे चपलांना उच्च दर्जाची नवी बाजारपेठ मिळेल, हॉटेलमध्ये चप्पल खरेदी केलेला उच्चवर्गातील ग्राहक पुढील वेळी थेट दुकानात येईल, उद्योग वाढीला चालना मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER