वंचित आघाडीकडून जलिल यांना उमेदवारी; कोळसे पाटलांना डच्चू

Jalil - Patil

औरंगाबाद : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने एकत्र येत वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. ही आघाडी स्वबळावर निवडणूक लढणार हे आधीपासूनच जाहीर करण्यात आले होते. यासाठी राज्यातील जवळपास सर्वच लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. मात्र औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम होता; परंतु आता हा तिढा सुटलेला असून, एमआयएमच्या हैदराबाद येथील पक्ष कार्यालयात रात्री उशिरा झालेल्या बैठकीत इम्तियाज जलिल औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.

ही बातमी पण वाचा : औरंगाबाद लोकसभा : काॅंग्रेसच्या उमेदवारावर खैरेंचे यश अवलंबून

आता जलिल हे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असणार आहेत . तर दुसरीकडे वंचित आघाडीकडून लढण्यास इच्छुक असलेले कोळसे पाटील यांना डच्चू देण्यात आला आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता हैदराबाद येथील एमआयएमच्या दार-उस्स- सलाम या पक्ष कार्यालयात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस एमआयएमचे सर्व २३ नगरसेवक, पक्षनेते उपस्थित होते. जिल्ह्यातील मुस्लिम, दलित मतांची संख्याही काढण्यात आली आहे. लोकसभेला ५२ ते ५५ टक्के मतदान होते. मतदानाची ही टक्केवारी गृहीत धरून उमेदवार निवडून येऊ शकतो का? याचेही गणित एमआयएम कार्यकर्ते यांनी पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यासमोर झालेल्या बैठकीत मांडले. खासदार ओवेसी यांनी औरंगाबाद शहरातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. सर्वांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवावी असे मत मांडले. उमेदवार म्हणून आमदार जलिल योग्य असल्याचे नमूद केले. रात्री उशिरा त्यांचे नाव जाहीर करण्यात आले.

ही बातमी पण वाचा : देश चालविण्यासाठी बुद्धीची गरज, छप्पन्न इंची छातीची नाही : प्रकाश आंबेडकर

ही बातमी पण वाचा : हिंमत असेल तर लोकसभा लढवून दाखवा ; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना आव्हान