वंचित आघाडीला ‘गॅस सिलेंडर’ तर, संभाजी ब्रिगेडला ‘शिलाई मशीन’ चिन्ह बहाल

VBA

नवी दिल्ली : महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांतच होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकते. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोबरअखेरीस संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुका होतील. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सर्व पक्ष तयारी करत असताना, निवडणूक आयोगानेही आपली तयारी सुरू केली आहे.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना चिन्हांचं वाटप सुरू केलं आहे. निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह बहाल केले आहे. तर संभाजी ब्रिगेडला शिलाई मशीन हे चिन्ह मिळालं आहे. याशिवाय मराठा मोर्च्यानंतर स्थापन झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाला हिरा हे चिन्ह देण्यात आलं आहे.

आगामी निवडणुकीत या पक्षांनी उमेदवार उतरवल्यास त्यांचे चिन्ह गॅस सिलेंडर आणि शिलाई मशीन असेल. राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षांची निवडणूक चिन्हं यापूर्वीचीच असतील. जसे काँग्रेसचा पंजा, भाजपचं कमळ, शिवसेनेचा धनुष्यबाण, राष्ट्रवादीचं घड्याळ, मनसेचं रेल्वे इंजिन अशी चिन्हं असतील.

निवडणूक आयोगाकडून पक्षांना बहाल केलेले चिन्ह

वंचित बहुजन आघाडी – गॅस सिलेंडर, संभाजी ब्रिगेड – शिलाई मशीन, महाराष्ट्र क्रांती सेना – हिरा, हम भारतीय पार्टी – ऊस घेतलेला शेतकरी, टिपू सुलतान पार्टी – किटली, भारतीय जनसम्राट पार्टी – टेलिफोन