वाळा – उष्णता कमी करणारी वनस्पती !

Vala.jpg

उन्हाळ्याच्या दिवसात वाळा बाजारात भरपूर बघायला मिळत असतो. स्वच्छ करून माठात घातला की पाण्याला छान सुगंध येतो आणि ते पाणी पिल्याने शरीरात थंडावा जाणवतो. असा अनेकांनी अनुभव घेतला असेल. बाजारात खस सरबत ही खूप प्रमाणात उपलब्ध असते. शरीराला थंड करणारा तहान भागविणारा वाळा सर्वांना तसा परीचयाचा असतो.

आयुर्वेदात वाळ्याला उशीर असे म्हटले आहे. नलद (गंध देणारा) सेव्य (सेवन करण्यायोग्य) जलवास (जलीय भागात उगविणारा) अमृणाल, समगंधक, वारितर, गंधाढ्य अशी पर्यायी नावे वाळ्याची आली आहेत. मराठीत वाळा हिंदीत खस अशी या वनस्पतीची ओळख. वाळ्याचे मूळ औषधी प्रयोगार्थ वापरतात. याचे मूळ सुगंधी असते. वाळल्यावर याचा सुगंध अधिकच वाढतो.

आयुर्वेदात (Ayurveda) वाळा वर्ण चांगला करणारा, दाह शमन करणारा सांगितला आहे. कडू मधुर रसाचा व थंड असल्याने पित्त कमी करणारा आहे. थंड असल्याने त्वचेची आग होत असल्यास वाळा घातलेल्या पाण्याने स्नान करावे. वाळ्याचा लेप लावावा. लगेच थंडावा जाणवतो. उन्हाळ्यात किंवा शरद ऋतुमधे उष्णतेमुळे घामाचे प्रमाण वाढलेले असते. शरीरावर घामोळ्या येणे, घामाने शरीरावर खाज सुटणे, शरीराला घामाचा दुर्गंध येणे अशा तक्रारी उत्पन्न होतात. यावर वाळा चंदनाचा लेप, वाळा स्नानाच्या पाण्यात भिजवून त्या पाण्याने स्नान करावे. शरीरातील अतिरिक्त घामाचे प्रमाण कमी होते. त्वचा विकार दूर होतात. शरीराला मंद प्रसन्न सुगंध दिवसभर जाणवतो. अतिशय स्वस्त व प्रभावी उपाय आहे.

वारंवार तहान लागणे पाणी पिऊनही समाधान न होणे हे लक्षण ताप, अतिसार, अम्लपित्त उन्हाळ्यात शरद ऋतुमधे दिसून येते. अशावेळी वाळा खूपच फायदेशीर ठरतो. वाळ्याचे खडीसाखरेसह सरबत ताजेतवाने करणारे असते. वाळा पाणथळ जागेत उगविणारी वनस्पति आहे शिवाय शीत वीर्याची असल्याने मूत्राचे प्रमाण वाढवितो. त्यामुळे उन्हाळी लागणे मूत्राचे प्रमाण कमी होणे, लघवी करतांना आग होणे अशा तक्रारींवर वाळा भिजविलेले पाणी खडी साखरेसह घेतल्याने फायदा होतो. नागीण झाल्यास त्वचेची अतिशय आग होते. स्पर्शसुद्धा सहन होत नाही. यावर वाळ्याचा लेप किंवा वाळ्याचे वस्त्रगाळ चूर्ण लावावे. त्वचेचा वर्ण उजळ करणारे असल्याने उटण्यात याचा वापर करतात. उशीरासव उशीरादि चूर्ण षडंग पानीय सुगंधी उटणे यात वाळ्याचा उपयोग केला जातो.

ही बातमी पण वाचा : वनस्पती परीचय – खदिर

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER