आजपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

CM Uddhav Thackeray - Coronavirus Vaccine

मुंबई :- जगभरात थैमान घालणाऱ्या करोना महामारी विरोधातील युद्धात भारताचे आज महत्वपूर्ण पाऊल पडत आहे. अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या करोनावरील (Corona) प्रत्यक्ष लसीकरणास (Vaccination) अखेर आजपासून (शनिवार)सुरूवात होत आहे. जगातील सर्वात मोठा असा हा लसीकरण कार्यक्रम असणार आहे. सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते राज्यव्यापी लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे.

राज्यातील लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सकाळी 11.30 वा. मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये होणार आहे. तर देशव्यापी लसीकरण मोहिमेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी 10.30 वा. होणार आहे. पंतप्रधान मोदी विलेपार्लेतील डॉ. आर. एन. कुपर रुग्णालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करणार आहेत.

मुंबईत एकूण 9 केंद्रांवर 40 बूथवर लसीकरण होणार आहे. सुरवातीला दररोज सरासरी 4 हजार जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविड 19 आजारावरील ‘कोविशील्ड’ या लसीचे सुमारे 1 लाख 39 हजार 500 डोस उपलब्ध झाले आहेत. महानगरपालिकेकडे 1 लाख 30 हजार लसींची लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे. या मोहिमेसाठी 7 हजार कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार तीन टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात करोनायोद्धय़ांना सर्वात आधी लशीचा लाभ मिळणार असून, दुसऱ्या टप्प्यात क्षेत्रीय आघाडीवर काम करणारे स्वच्छता कर्मचारी व कामगार, पोलीस आदी. त्यानंतर तिसरऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील सर्व नागरिक तसेच 50 वर्षाखालील सहव्याधी (मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी) असणारे नागरिक यांना लसीकरण करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात मुंबईत 63 लसीकरण केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यांद्वारे दररोज सुमारे 50 हजार नागरिकांचे लसीकरण करता येणार आहे. केंद्र सरकारने राज्यांना लसीकरणासंबंधी नियमावली पाठवली आहे. या नियमावलीत लसीकरणादरम्यान कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या नाही याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. लसीकरणासाठी वयोमर्यादा आखण्यात आलेली असून १८ पेक्षा जास्त वय असलेल्यांनाच यामध्ये सहभागी करुन घेण्यास सांगण्यात आलं आहे. याशिवाय गरोदर माता किंवा ज्यांना गरोदरपणाबद्दल नक्की माहिती नाही तसंच स्तनपान करणाऱ्या मातांचं लसीकरण करु नये असं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे.

ही बातमी पण वाचा : देशभर लस पोहोचल्यानंतर आदर पुनावालांनी साजरा केला 40 वा वाढदिवस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER