लसीचा साठा नसल्याने पुन्हा लसीकरण थांबले; मुंबईकर संतापले!

protest

मुंबई :- मुंबईत आज लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कारण लसीचा साठा नसल्याने पुन्हा एकदा लसीकरण थांबले. रविवारी रात्री पालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर दीड लाख लसींचा साठा उपलब्ध करण्यात आला. या साठ्यामध्ये कोविशिल्ड (Covishield) आणि कोवॅक्सीन (Covaccine) अशा दोन्ही लसींचा समावेश होता. सोमवारी लसीकरण पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशीसाठी लसींचा साठा पुरेसा नव्हता. लसी न मिळाल्यास मंगळवारी लसीकरण मोहीम बंद पडेल, अशी शक्यता होती.

मात्र, आज तसेच झाले. मुंबईच्या बीकेसी लसीकरण केंद्रावर आज सकाळी केवळ ४०० जणांना कोविशिल्ड लस देण्यात आली. त्यानंतर साठा उपलब्ध नसल्यामुळे नवीन लस घेण्यासाठी आलेले आणि कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना परत जावे लागले आहे. कोवॅक्सीन लस घेतलेल्या लोकांना दुसरा डोस बीकेसी केंद्रावर उपलब्ध करून दिला जात आहे. परंतु त्याचा साठाही केवळ दोन हजार इतका शिल्लक आहे. त्यामुळे आज या केंद्रात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी आहे. यात वयोवृद्धांचाही समावेश होता.

काही लोक लस न घेता निघून गेले, तर काही नागरिकांनी आधी जे टप्पे घोषित केले, त्या लोकांना लस द्या. त्यानंतर उर्वरित किंवा नवीन टप्प्यांना लस द्या, अशी मागणी केलेली आहे. बीकेसी लसीकरण केंद्र हे दोन लाख मुंबईकरांना लसी देणारे देशातील पहिले केंद्र असेल; परंतु सध्या या केंद्रावर लस उपलब्ध नसल्यामुळे पुन्हा लसीकरण बंद करण्याची वेळ आलेली आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत लसींचा साठा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. तो साठा मिळाला तर बुधवारी लसीकरण सुरू राहील, अन्यथा बुधवारीही लसीकरण बंद ठेवावे लागेल, अशी भीती या केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश ढेरे यांनी व्यक्त केली आहे.

ही बातमी पण वाचा : आता घरपोच प्या देशी दारू आघाडी सरकारचा निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button