लस घेणे हे अग्निदिव्य होऊ नये

Shailendra Paranjapeमहाराष्ट्र ही संतांची भूमी, प्रागतिक विचारांमधून विविध प्रकारच्या सामाजिक सुधारणा राज्यातच नव्हे तर देशपातळीवर सुरू करणाऱ्या सुधारकांची भूमी आणि त्यामुळेच जीवनाच्या विविध क्षेत्रांत महाराष्ट्राने देशाला नेतृत्व दिले आहे. महाराष्ट्राचे देशात अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान आहे तसेच महाराष्ट्रात पुण्याचे आहे. पुण्याने कायमच राज्याला आणि देशालाही दिशा देण्याचे काम केले आहे आणि ही परंपरा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांच्याबरोबरच रानडे, गोखले, महर्षी कर्वे, टिळक, आगरकर यांच्यासारख्यांनी पुढे चालवली आहे.

पुण्याचा हा लौकिक कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी आणि आता दुसऱ्या लाटेच्या वेळीही बदलौकिकात रूपांतरित झाला आहे. त्यासाठी कारणीभूत असलेल्या ढिसाळ नियोजन आणि राजकीय हेतूने या सर्व प्रश्नाकडे पाहिले गेल्याने पुण्यात कोरोनाची स्थिती बिघडत गेली, असे म्हणावे लागते. गंगाधर गाडगीळ यांच्या ‘किडलेली माणसं’ या कथेतल्या माणसांप्रमाणे केवळ आणि केवळ स्वार्थाचे दर्शन लसीकरणाच्या कार्यक्रमातून घडले आहे.

लसीकरणासाठी पुण्याचं नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलं ते सीरम इन्स्टिट्यूटमुळे. ऑक्स्फर्ड विद्यापीठाने केलेल्या संशोधनावर आधारित लसविकसन अँस्ट्राझेनिका कंपनीने केले आणि लसनिर्मितीचं प्रत्यक्ष काम पुण्यातल्या सीरम या लस उत्पादक कंपनीनेही केलंय. त्यामुळे पुण्यातून जगभर लस गेली; पण पुण्यात मात्र लसीकरणाचे तीनतेरा वाजले आहेत. असं का व्हावं?

राजकीय हस्तक्षेप आणि विविध पातळ्यांवर भ्रष्ट व्यवस्थेमुळे या भ्रष्टाचाराच्या साखळीत सामान्य माणसाला नियमाप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा लाभ घ्यायचा म्हटला की, अग्निदिव्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पुण्यात दोनच दिवसांपूर्वी याच लेखमालेतल्या लेखात सिंगहड रस्ता भागातल्या एका पुढाऱ्याला घरी जाऊन लस देण्यात आली आणि त्यासाठी लसीकरण केंद्रावरच्या अधिकाऱ्यांवर कसा दबाव आणला गेला, हे लिहिले होते. असे प्रकार मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे पुण्यातल्या नागरिकांमध्ये लसीकरणाच्या एकूणच व्यवस्थेबद्दल चीड निर्माण झाली आहे.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणेकरांचा हा संताप लक्षात घेऊन लसीकरण केंद्रांसाठी नियमावली तयार केलीय. वास्तविक, मागच्या आठवड्यात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट आदेश दिले होते की, राजकारण्यांना, पुढाऱ्यांना लसीकरण केंद्रांपासून दूर ठेवा; पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. अशा स्थितीत आयुक्तांनी ही नियमावली जाहीर केलीय. लसीकरणाच्या कामात हस्तक्षेप केल्यास शासकीय कामात अडथळा आणल्यासाठी दाखल केला जाणारा गुन्हा संबंधितांवर दाखल करावा, असे त्यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत. त्याशिवाय लसीकरण केंद्रावर सर्वप्रथम प्राधान्य दिव्यांग व्यक्तींना द्यावे, त्यानंतर लसीचा दुसरा डोस घ्यायला आलेले नागरिक, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, मग ऑनलाइन बुकिंग केलेले नागरिक आणि सगळ्यात शेवटी प्राधान्य द्यावे ते थेट लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना, असे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

वास्तविक, हे आदेश स्वतंत्रपणे देण्याची गरज आहे का, हा प्रश्न निर्माण होतो; कारण सामान्य व्यवस्थाच अशी असायला हवी; कारण दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य, ज्येष्ठ नागरिक आणि दुसरा डोस घ्यायला आलेले, हे नागरिक गट स्वाभाविकपणे प्राधान्याने यायलाच हवेत. पण कोणत्याही प्रकारची नोंद न करता आलेल्यांना लसीकरण केंद्रात येऊ देण्याची गरजच काय, हा प्रश्न येतो. दुसरी गोष्ट म्हणजे संगणकसाक्षर वा मोबाईलवरून नोंदणी करता येत नाही, अशांसाठी स्वतंत्र कक्ष करावा; पण लसीकरण केंद्रात अशांची गर्दी होऊ देऊ नये. त्याशिवाय दिव्यांग व्यक्तींनाही स्वतंत्र व्यवस्था केली जावी म्हणजे त्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना उन्हातान्हात, रांगेत तिष्ठत थांबणे, खूप वेळ थांबणे, या गोष्टी टाळता येतील. वारीच्या काळात, गणेशोत्सवात तात्पुरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था केली जाते. तशीच ती लसीकरण केंद्रावर असावी; कारण ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांगांना तसेच मधुमेहींनाही स्वच्छतागृह ही गरज असते आणि त्यांना खुरडत खुरडत जास्ती अंतर जावे लागू नये, यासाठी ही व्यवस्था केंद्राच्या आवारात रांगेच्या जवळपास असावी.

लसीकरण केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि त्याचे थेट रेकॉर्डिंगही सामान्य माणसाला उपलब्ध करून द्यावे; कारण लसीकरणात कोणतीही बाब गोपनीय नाही. त्यामुळे पुढाऱ्यांना घरी जाऊन लस दण्यासारखे प्रकार होऊ नयेत आणि रांगेतल्यांना न्याय मिळावा, यासाठी पारदर्शकता येण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी हेही करावेच.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button